पांजरपोळ गोरक्षण संस्थेला वसुबारस निमित्त २० हजारांची देणगी…
करमाळा, प्रतिनिधी – हिंदु संस्कृतीत गाईला आणि दिवाळीत वसुबारसच्या पर्वाला अनन्य साधारण महत्त्व आहे. पाळीव जनावरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारसेला गोमातेचे पूजन केले जाते. आधुनिक काळात पारंपरिक पशुपालन मागे पडले असले तरी देशी गोवंश वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या गोरक्षण संस्थांना दानशुरांनी देणगीच्या स्वरूपात मदत केली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ. श्रीराम परदेशी यांनी व्यक्त केले. शहरातील पांजरापोळ गोरक्षण संस्थेत वसुबारस निमित्त मान्यवरांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले, याप्रसंगी डॉ. परदेशी बोलत होते.
पुढे बोलताना डॉ. परदेशी म्हणाले की, वसुबारस परंपरा हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. करमाळा शहरातही पांजरपोळ गोरक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी वसुबारस या दिवशी गोमातेचे पूजन केले जाते, ही बाब कौतुकास्पद आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे गोवंशाचे जतन संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील पिढीनेही गोवंशबाबत जागरूकता दाखवावी, हीच खऱ्या अर्थाने आजच्या वसुबारस दिनाच्या वतीने खरा संदेश देण्याचे काम या संस्थेने केलेले आहे.
वसुबारस निमित्त रतनचंद तलकचंद दोशी यांच्याकडून गोशाळेसाठी वीस हजार रुपयांची देणगी देण्यात आली. यासोबतच भूपाली दोशी हिच्या वाढदिवसानिमित्त एक पोते गोळी पेंड तर संदीप चुंग यांच्याकडून एक गाडी चारा देणगी स्वरुपात देण्यात आला. यावेळी पांजरापोळ गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष भरतकुमार गांधी, सचिव सुयश दोशी, परमेष्टी दोशी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक परेश दोशी, राधेश्याम देवी, जाकिर पठाण, अमित दोशी, राजेश दोशी, अमित उपाध्ये, महेश परदेशी, विजय देशपांडे, अंगद देवकते, शिवनाथ घोलप, नरेंद्रसिंह ठाकुर, संघर्ष दयाळ, अनंत मसलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.