करमाळा उपजिल्हा रुग्णालयात कर्करोग तपासणी शिबिर; उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांसाठी प्रयत्न करु -आमदार नारायण पाटील…
करमाळा, प्रतिनिधी – करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शनिवार दि. १० रोजी कर्करोग जनजागृती मोहीम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. करमाळा तालुक्याचे आमदार नारायण पाटील यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, बदलती जीवनशैली व खानपानामधील बदलांमुळे कर्करोग रुग्ण संख्या वात असल्याचे दिसून येत आहे. कर्करोगाला घाबरून न जाता त्याचे लवकरात लवकर निदान करून उपचार गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील सोयी-सुविधां बाबत शासनाकडे पाठपुरावा करु असे आश्वासन देऊन शिबिराच्या अनुषंगाने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी आदिनाथ स.सा. कारखान्याचे संचालक तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉ. अमोल घाडगे आणि फारूक जमादार, सोलापूर जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन गुंजकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. काटकर, करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे, स्त्री रोग तज्ञ डॉ. स्मिता बंडगर, कृष्णा हॉस्पिटलच्या डॉ. कविता कांबळे, पत्रकार जयंत दळवी, सामाजिक कार्यकर्ते सुनील सावंत आदीजण उपस्थित होते. यावेळी डॉ. अमोल घाडगे, डॉ.कविता कांबळे यांनी उपस्थितांना कर्करोगाबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. गजानन गुंजकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयामधील सर्व डॉक्टर, कर्मचारी तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैदयकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय बालस्वास्थ अधिकारी, आरोग्य सेविका, सेवक, आशा गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.
शनिवारी झालेल्या कर्करोग शिबिरात २५६ स्त्री-पुरुषांची अत्याधुनिक, सर्व सोयींनी सुसज्ज कॅन्सर व्हॅन द्वारे तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये स्री रोग तज्ञ डॉ. स्मिता बंडगर, दंतरोग चिकित्सक डॉ, गोरक्षनाथ शिंदे यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले.
.
.