शहरातील दंडेलशाहीला लगाम; दैनंदिन वसुलीचा खाजगी ठेका रद्द…!!!
नगरपालिका नियमाप्रमाणे अल्प दरात रस्ता फी घेणार -मुख्याधिकारी सचिन तपसे
करमाळा, प्रतिनिधी – दैनंदिन रस्ता फी वसुलीचा खाजगी ठेका रद्द करण्यात आला असून शहरात रस्त्यावर भाजी, फळे विक्री करणारे, इतर व्यावसायिक, हातगाडी धारक आणि ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी आता नगरपालिकेच्या अधिकृत व्यक्तीलाच नियमानुसार पैसे द्यावेत, असे आवाहन मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी केले आहे.
दैनंदिन रस्ता फी वसुलीचा ठेका मदन लेकुरवाळे यांच्या नावावर होता. मात्र प्रत्यक्षात बबन चांदगुडे हा वसुली करत होता. भाजीपाला विक्रेते, हातगाडी व्यावसायिकांकडून शंभर-दोनशे रुपये पासून दमदाटी करून तो पैसे वसूल करत असल्याच्या अनेक तक्रारी नगरपालिकेत दाखल झाल्या होत्या. मात्र ०९/०५/२५ रोजी या ठेक्याची मुदत संपल्यामुळे आता नगरपालिकेच्या अधिकृत व्यक्तीशिवाय कोणालाही रस्ता फी विक्रेत्यांनी देऊ नये. शासनाच्या नियमाप्रमाणे माफक रस्ता वसुली उद्यापासून केली जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे.
करमाळा शहरात रस्त्यावर भाजीपाला व इतर व्यवसाय करणाऱ्या गोरगरीब विक्रेत्यांकडून दमदाटी करून बबन चांदगुडे अव्वाच्या सव्वा रक्कम उपस्थित करत होता. याची आम्ही वारंवार तक्रार केली होती. मात्र त्याच्या दमदाटी पुढे आमचा निभाव लागत नव्हता. पण आता मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी योग्य निर्णय घेतला असून रस्त्यावर बसणाऱ्या सर्व विक्रेत्यांना सुख लागेल.
-अलीम बागवान,
अध्यक्ष, भाजीपाला विक्रेता संघटना.
ग्रामीण भागातून भाजीपाला, कोंबड्या इतर साहित्य विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना बबन चांदगुडे यांचा प्रचंड त्रास होता. मदन लेकुरवाळे यांच्या नावावर ठेका असताना बबन चांदगुडे रस्ता फी वसुली करत होता.
याबाबत आम्ही शिवसेनेच्या वतीने तक्रार केली होती.
आता यामुळे रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी केवळ नगरपालिकेच्या व्यक्तीलाच फक्त पाच रुपये देऊन पावती घ्यावी.
-निलेश चव्हाण,
शिवसेना शाखाप्रमुख, रंभापुरा.
.
.
.