बोअरमधील विद्युतपंप काढत असताना दोर तुटून डोक्याला लाकूड लागल्याने बिटरगावात महिलेचा दुर्दैवी मृत्यू…
करमाळा, प्रतिनिधी – शेतातील बोअरमधील विद्युतपंप काढताना दोर तुटून लाकूड डोक्याला लागल्याने मनीषा नितीन मुरूमकर (वय-३४ वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. सोमवार दि. ५ रोजी तालुक्यातील बिटरगाव (श्री) येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मनीषा आणि नितीन मुरूमकर आपल्या दोन मुलांच्या मदतीने शेतातील बोअरमधील विद्युतपंप काढत होते. यावेळी विद्युतपंपाचा दोर लोखंडी ड्रम वरुन घेऊन ट्रॅक्टरला बांधून ओढायचा प्रयत्न सुरु होता. दुर्दैवाने हा दोर तुटला आणि दोराला बांधलेल्या लाकडाचा मनीषा मुरूमकर यांच्या डोक्याला जोरदार फटका बसून त्या गंभीर जखमी झाल्या. यानंतर माजी सरपंच शिवाजी मुरुमकर, वैभव मुरूमकर, मधुकर शिर्के, भाऊसाहेब बाबर, गणेश बाबर यांनी तात्काळ मनीषा यांना करमाळा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना बुधवार दि. ७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
बिटरगाव (श्री) येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सासू-सासरे असा परिवार आहे. बिटरगाव श्री विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष लालासाहेब मुरूमकर यांच्या त्या सून व पत्रकार अशोक मुरूमकर यांच्या त्या चुलत भावजय तर माजी सरपंच शिवाजी बाबर यांच्या त्या कन्या होत.
.
.
.
.
.
.