‘घटस्फोट दे’ म्हणत पत्नीसह सासरच्यांची तरुणाला मारहाण…
करमाळा, प्रतिनिधी – न्यायालयातील तारखेला हजर राहून वडिलांसोबत मोटार सायकलवर गावी परत निघालेल्या तरुणाला पत्नीसह सासरच्या मंडळींनी रस्त्यात गाठून मारहाण केली आहे. बुधवार दि. ७ रोजी करमाळा-टेंभूर्णी रस्त्यावर करमाळा तालुक्यातील भाळवणी येथे ही घटना घडली आहे.
याबाबत प्रताप गोरख राऊत (वय-३६, रा. चौंडेश्वरवाडी, ता. माळशिरस जि. सोलापुर) यांनी दि. ०७/०५/२५ रोजी करमाळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे लग्न राजुरी (ता. करमाळा) येथील पुनम लक्ष्मण शिंदे हिचेसोबत २०१९ मध्ये झाले होते. कौटुंबिक वादामुळे पत्नी पूनम ही २०२१ पासून माहेरी राहत असून तिने घटस्फोटासाठी करमाळा न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. दि. ०७/०५/२५ रोजी करमाळा न्यायालयात असलेल्या तारखेला हजर राहून प्रताप हे वडील गोरख यांच्यासोबत त्यांच्या चौंडेश्वरवाडी या गावी मोटरसायकलवर जात होते. यावेळी दुपारी दोनच्या सुमारास भाळवणी येथील एस.टी. स्टॅण्डजवळ पाठीमागुन मोटारसायकल वरुन आलेल्या लक्ष्मण काशीनाथ शिंदे, पुनम प्रताप राऊत, अनिकेत लक्ष्मण शिंदे यांनी ‘तु घटस्फोट दे, नाहीतर आम्ही तुला सोडणार नाही’ असे म्हणून प्रताप यांच्या डोक्यात व डाव्या हातावर लाकडी काठीने मारुन जखमी करुन शिवीगाळ व दमदाटी केली आहे.
प्रताप गोरख राऊत यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी लक्ष्मण काशीनाथ शिंदे, पुनम प्रताप राऊत, अनिकेत लक्ष्मण शिंदे यांच्यावर भा.न्या.सं. २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक पी.बी. टिळेकर हे पुढील तपास करत आहेत.
.
.
.
.