छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्याबाबत पारेवाडीच्या सरपंचावर कारवाईची मागणी…
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील पारेवाडी येथील सरपंच महापुरुषांच्या जयंतीला उपस्थित राहत नसल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी पारेवाडी येथील महादेव लक्ष्मण देशमुख यांनी करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज केला आहे.
याबाबत देशमुख यांनी दि. ०८/०५/२५ रोजी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार सर्व शासकीय कार्यालयांत सर्व महापुरुषांची जयंती साजरी करणे क्रमप्राप्त आहे. पारेवाडी ग्रामपंचायतीत दि. १९/०२/२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. मात्र या कार्यक्रमास सरपंच सौ. वंदना हनुमंत नवले या उपस्थित राहणे गरजेचे असताना त्या अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे त्यांची महापुरुषांबद्दलची भावना द्वेषपूर्ण असल्याचे दिसून येते. ही बाब संताप जनक असल्याचे देशमुख यांनी या अर्जात नमूद केले आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून सरपंच सौ. नवले यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी देशमुख यांनी या अर्जाद्वारे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. देशमुख यांनी या अर्जाच्या प्रती खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार नारायण पाटील यांच्यासह तहसीलदार करमाळा यांना दिल्या आहेत.
.
.
.
.