पारेवाडी येथील जयंती कार्यक्रमास अनुपस्थितीबाबतचे हलगी नाद आंदोलन तुर्तास स्थगित -नागेश कांबळे…
करमाळा, प्रतिनिधी – ग्रामपंचायत पारेवाडी येथील जयंती कार्यक्रमास सरपंच व उपसरपंच अनुपस्थित राहिल्यामुळे याबाबत चौकशी व्हावी यासाठी दिलेल्या अर्जावर कारवाई होत नसल्याने आर पी आय चे नागेश कांबळे यांनी शुक्रवारी करमाळा तहसील कार्यालयासमोर हलगी नाद आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर याविषयी चौकशी होऊन अर्जदाराला लेखी पत्र दिले गेले असल्याने हे आंदोलन स्थगित करत असल्याचे कांबळे यांनी गुरुवारी जाहीर केले आहे.
तालुक्यातील पारेवाडी ग्रामपंचायतीत दि. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्याबाबत चौकशी व्हावी म्हणून राजेंद्र गरड यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. हा अर्ज देऊन पंधरा दिवस उलटून गेले तरीही चौकशी केली गेली नसल्याने आर पी आय चे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे यांनी शुक्रवार दि. ९ रोजी करमाळा तहसील कार्यालयासमोर हलगी नाद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र यानंतर गट विकास अधिकारी अमित कदम यांनी विस्तार अधिकारी सदाशिव थोरात यांना याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. ही चौकशी होऊन अहवाल सादर केला गेल्यानंतर गटविकास अधिकारी कदम यांनी अर्जदार गरड यांना लेखी पत्र दिले असल्याने तूर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे कांबळे यांनी सांगितले आहे.
लेखी पत्र दिल्यामुळे आंदोलन तूर्तास स्थगित केले गेले असले तरी याबाबतचा खुलासा समाधानकारक वाटत नसल्याने सदर प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी कांबळे यांनी शेवटी केली आहे.
.
.
.
.