सभासद राजा जागा हो…. आदीनाथच्या पट्ट्याचा धागा हो….!!!
कट्टरता बाजूला ठेवून कारखान्याच्या हिताचा विचार होणे गरजेचे
करमाळा – धुराडे बंद असले तरी आदिनाथच्या निवडणुकीच्या भट्टीने जोरदार आग पकडली आहे. आदीनाथांच्या या अग्निहोत्रात बॉयलर मधील रसाला चाचणी येण्यासाठी प्रयत्नांचा समिधा घालण्याऐवजी केवळ आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवली जात आहे. मात्र आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आदिनाथ काबीज करण्यासाठी निघालेल्या राजकारण्यांचा स्वार्थ ओळखुन कारखान्याच्या सभासदांनी आपली कट्टरता निवडणुकीपुरती बाजूला ठेवून कारखान्याच्या धुराड्यातून योग्य धूर काढू शकणाऱ्या नेतृत्वाला निवडून देण्याची गरज आहे.
बंद असलेल्या कारखान्याच्या निवडणुकीबाबत सुरुवातीला तालुक्यातील राजकीय गट उदासीन असले तरी मा.आ. शिंदे यांनी या निवडणुकीसाठी अर्ज घेतल्याने इतर गटांनी डोळे विस्फारले. खबरदारी म्हणून निवडणूक प्रक्रियेत भाग घेत या गटांच्या पडद्यामागूनच्या हालचाली सुरू झाल्या. सामान्य सभासद या निवडणूकीसाठीच्या संभाव्य युत्या-आघाड्यांचा कयास लावेपर्यंत तर विकासाच्या राजकारणापेक्षा कुरघोड्यांच्या राजकारणात माहीर असलेल्या मातब्बरांनी या निवडणूकीची दिशा फायनल करून टाकली आणि आदिनाथची रणधुमाळी सुरू झाली.
आदिनाथशी आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाशी संबंधित मोहिते-पाटील परिवाराची करमाळा तालुक्यातील आदिनाथशी संबंधित बागल, आ.पाटील आणि मा.आ.जगताप गटाशी असलेली जवळीक पाहता बाजार समितीच्या निवडणुकीप्रमाणे सुरुवातीला आदिनाथची निवडणूकही बिनविरोधच होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र संजयमामांनी निवडणुकीसाठी स्वतःचा अर्ज भरल्यानंतर शिंदे आणि मोहिते पाटील यांच्यातील सापा-मुंगसाचे वैर पुन्हा ताजे झाले आणि बिनविरोधचा प्रस्ताव बारगळला. त्यापुढे आदिनाथ च्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली.
सुरुवातीला बागल गटाने आदिनाथच्या हिताचा विचार करून ही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. यानंतर जगताप गटानेही या निवडणुकीत पंचाची भूमिका घेणार असल्याचे सांगत काढता पाय घेतला. दरम्यान या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या संजयमामाच्या महायुती आदिनाथ बचाव पॅनलने सर्वप्रथम नारळ फोडून प्रचार सभांमध्ये कारखान्याच्या भवितव्यासंबंधीचे नियोजन सभासदांपुढे मांडण्यास सुरुवात केली. यानंतर विद्यमान आमदार पाटील यांच्या आदिनाथ संजीवनी विकास पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटला. यावेळी आदिनाथ निवडणुकीत पंचाची भूमिका घेणार असल्याचे जाहीर केलेल्या मा.आ. जगताप यांची उपस्थिती होती. विद्यमान आमदार असताना आदिनाथ चालू करण्यासाठी काय करणार हे सांगण्यापेक्षा संजीवनी पॅनलच्या प्रचार सभांमध्ये मात्र महायुती पॅनलच्या प्रचार सभांमध्ये झालेल्या भाषणांवर टिका-टिप्पण्णी करून टर उडवण्याचे आणि श्रोत्यांचे केवळ मनोरंजन करण्याचे काम सुरू झाले.
मा.आ. शिंदेंनी म्हैसगाव येथील स्वतःचा विठ्ठल शुगर कारखाना विकल्याचे संजीवनी पॅनलच्या सभांमध्ये सांगण्यात येत असले तरी अन्न पुरवठा मंत्रालयाने साखरेच्या सिरप पासून इथेनॉल बनवण्यावर बंदी घातल्याने तसेच खाजगी साखर कारखानदारीवर सरकारच्या बदलत्या धोरणामुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन विठ्ठल शुगर हा कारखाना ओंकार शुगर्स या समूहात विलीन केल्याचे वारंवार सांगितले आहे. साखर कारखानदारीच्या पुर्वानुभवावरून मा.आ. शिंदेनी आदिनाथ पुनर्जीवित करण्यासाठीचे नियोजन सभासदांना रुचू लागल्याने प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात संजय मामांच्या सभांना गर्दी दिसू लागली असून यामुळे संजीवनी पॅनलच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून सभासदांची मोठी फळी पाठीशी असलेल्या बागल गटाची मदत मिळवण्याचे प्रयत्न संजीवनी पॅनलकडून सुरू झाले आहेत.
प्रत्यक्षात स्थानिक गटांत होणाऱ्या या निवडणुकीला पक्षीय आधाराची किनार लावली गेली आहे. त्यानुसार खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार नारायण पाटील हे राष्ट्रवादी (शप) पक्षाचे प्रतिनिधी आहेत. मा.आ. जगताप हे विद्यमान आमदार पाटील यांच्या सोबत आहेत. म्हणजे आदिनाथ संजीवनी विकास पॅनल हा महाविकास आघाडी पुरस्कृत तर मा.आ. संजय मामा शिंदे यांचा महायुती आदिनाथ बचाव पॅनल हा उघड उघड महायुतीचाच पॅनल आहे. सध्या बागल गटाने पाठिंब्याबाबत कोणतीही भूमिका जाहीर केली नसली तरी मोहिते पाटील यांच्याशी असलेले हितसंबंध आणि रश्मी बागल या भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा आणि दिग्विजय बागल हे शिंदेसेनेत असल्याने पक्षीय राजकारणाचा विचार करता त्यांची साथ संजयमामांना मिळणे अपेक्षित आहे.
याशिवाय पवारांच्या बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष असलेले जामखेड तालुक्यातील बारा गावांत हाळगाव कारखान्याच्या निमित्ताने गुळवे यांचा चांगला संपर्क असलेले सुभाष गुळवे हे महायुतीच्या संजयमामांच्या प्रचारात व्यस्त असून शिंदेंच्या सभांमधील बॅनरवर मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित दादा यांच्या बरोबरीने जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा फोटो झळकत आहे. गुळवे यांचा या बारा गावांतील संपर्क मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाटील गटाकडून जामखेड तालुक्यातील जवळा येथे भाजपाचे प्रा. राम शिंदे यांची सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले मात्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. शिंदे यांची या सभेला अनुपस्थिती राहिली.
थोडक्यात स्थानिक गटातटाच्या राजकारणात सोयीनुसार पक्षीय राजकारणाचा आधार घेतला जात आहे. सर्व गदारोळात आदिनाथ चालणार की बंदच राहणार याचा विचार बाजूला पडला आहे. माढा लोकसभेचे खा. धैर्यशील मोहिते पाटील आणि तालुक्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील हे कारखान्याच्या निवडणुकीत नेतृत्व करत असले तरी विरोधी पक्षात असल्याने शासन स्तरावर त्यांना कारखान्यासाठी ठोस मदत मिळू शकते का, भाजप आणि शिवसेनेत असलेले बागल भावंडे मोहिते पाटील यांच्या समाधानासाठी विद्यमान आमदार पाटील यांच्या पॅनलला मदत करतील की महायुतीत असल्याने महायुतीच्या बॅनरखाली कारखाना निवडणूक लढवणाऱ्या माजी आमदार शिंदे यांना बळ देतील किंवा कट्टर असलेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे पसंतीच्या उमेदवाराला मते देण्याची मुभा देतील यावर निवडणुकीतील दोन्ही पॅनलचे भवितव्य अवलंबून आहे.
अशाप्रकारे सोयीनुसार स्थानिक किंवा पक्षीय राजकारणाचा आधार घेत निवडणूक जिंकण्याचे मनसुबे रचत करमाळा तालुक्याच्या राजकीय पटलावर आपला गट शाबूत ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या पुढाऱ्यांचे पाईक होऊन त्यांच्या विचाराने चालण्यापेक्षा आदिनाथच्या सभासदांनी आदिनाथ चालू होऊ त्याचा पट्टा सुरळीत आणि अविरत चालू राहण्यासाठी कोण योग्य ठरेल, याचा सारासार विचार करून योग्य उमेदवार निवडून देऊन कारखान्याच्या पट्ट्याचा धागा बनण्याची गरज आहे.
.
.