आघाडीतील “बिघाडी” व महायुतीने दिलेली “हुलकावणी” यामुळे आबांच्या संजीवनीची वाट खडतरच…


करमाळा – आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता निर्णायक वळणावर आलेली असून या लढतीमध्ये नारायण आबांच्या संजीवनी पॅनलची वाट खडतरच दिसत आहे. सुरुवातीला मोहिते पाटलांचे समर्थन व जयवंत भाऊंची साथ यामुळे ही लढत आबांसाठी सोपी वाटत होती, परंतु पहिल्याच टप्प्यात जयवंत भाऊंनी आपण पंचांची भूमिका घेणार असल्याचे सांगितले.या धक्क्यामुळे आबांनी संजयमामांच्या केम ऊस उत्पादक गटातून सपशेल माघारी घेऊन शरणागती पत्करली व आपला उमेदवारी अर्ज भटक्या विमुक्त जमाती मधून ठेवला.

या धक्क्यामुळे आबांना प्रचार सुरू करण्यास ३-४ दिवस विलंब झाला. मामांच्या महायुतीने मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रचाराचा नारळ फोडला आणि त्याच कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे आमदार रोहित दादा पवार यांचे खंदे समर्थक सुभाषआबा गुळवे यांनी उपस्थित राहून आबांना दुसरा धक्का दिला. या दोन धक्क्यांमुळे आबांनीं अकलूजची वारी करून महाविकास आघाडीतील बिघाडी रोखण्याचा प्रयत्न केला. मोहिते पाटलांच्या मध्यस्थीतून जयवंत भाऊंनी संगोबा येथे नारळ फोडायला हजेरी लावली, मात्र त्यानंतर एकाही सभेला ते उपस्थित राहिले नाहीत. अशातच भाऊंची ही उणीव संजीवनी पॅनलसाठी धोक्याची घंटा असल्याच्या चर्चा सभासदांमध्ये जोर धरू लागल्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची संजयमामा व सुभाष आबा यांनी भेट घेतल्यामुळे आदिनाथच्या सभासदांमध्ये सकारात्मक संदेश गेला.

महायुती मधील घटक पक्ष असलेले शिवसेनेचे महेश चिवटे व भाजपाचे गणेश चिवटे हे सुद्धा दररोजच्या सभांमध्ये उपस्थिती लावत असून महायुती एकसंघ असल्याचा विश्वास सभासदांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. याचा फायदा संजयमामांच्या पॅनलला होणार आहे. दुसरीकडे नारायण आबा पाटलांनी रोहित दादा पवारांचे प्रतिस्पर्धी म्हणून राम शिंदे यांना जामखेड तालुक्यातील जवळा येथे होणाऱ्या सभेसाठी निमंत्रित केले, परंतु त्यांनीही त्या सभेकडे सपशेल पाठ फिरवली. जयवंत भाऊंनीही अनुपस्थित राहिले. या साऱ्या घडामोडीमुळे संजीवनी पॅनल ची वाट अधिकच बिकट असल्याची चर्चा सभासदांमध्ये जोरदार सुरू आहे.

तेलही गेले… तूपही गेले
तेलही गेले… तूपही गेले. हाती राहिले धुपाटणे याप्रमाणे आबांच्या संजीवनी पॅनलची अवस्था झाली असून या निवडणुकीमध्ये त्यांनी निष्ठा बदलली, फोटो बदलले, फ्लेक्स बदलले एवढे सगळे करूनही पुढचं पाठ मागचं सपाट अशी त्यांची अवस्था झाली. सुरुवातीला रोहित दादा पवारांचा फोटो वापरला नंतर तो वगळला. आम्ही कोणत्याही पक्षात जाऊ असे सांगून सभापती राम शिंदे यांचा फोटो वापरला. या साऱ्या धरसोड प्रवृत्तीमुळे ना घर का ना घाट का अशी अवस्था या पॅनलची झाली असून महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींचीही भक्कम साथ या पॅनलला न मिळाल्यामुळे तेलही गेले तूपही गेले असे त्यांचे कार्यकर्ते आता खाजगीत बोलू लागले आहेत.

.

.

.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page