दहिगाव योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना ‘दुष्काळात तेरावा महिना’; पाणी तर नाहीच पण पाणीपट्टी वसुलीची नोटीस…
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेत समाविष्ट पूर्व भागातील २४ गावांतील शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टी भरण्याच्या नोटिस पोस्टाने पाठवल्या आहेत. २०२५ चे उन्हाळी आवर्तन सुरू होऊन महिना होत आला तरी अद्याप टेल भागामध्ये पोहोचलेले नसताना अशा नोटिसा पोस्टाने आल्याने या भागातील शेतकऱ्यांना ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
२०२५ चे उन्हाळी आवर्तन सुरू होऊन महिना होत आला आहे. मात्र अद्याप टेल भागामध्ये पाणी पोहोचलेले नाही. पाणी सोडण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी दि.७ एप्रिल रोजी पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन त्यावेळी मागे घेण्यात आले होते. उभी पिके पाण्यावाचून जळून जात असताना पाणीपट्टीसाठी आलेली नोटीस म्हणजे या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची भावना या शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
वारंवार मागणी करूनही पाणी सोडण्यात आले नसल्याने उद्या दि.१५ रोजी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. तत्पूर्वीच या नोटीस आल्यामुळे पाटबंधारे विभाग संबंधित आंदोलन दडपण्यासाठी नोटिसीचे शस्त्र वापरत असल्याची चर्चा या शेतकऱ्यांत होत आहे.
काय आहे नोटीस ?
संबंधित नोटीसीमध्ये असे म्हटले आहे की, दहिगाव उपसा सिंचन योजनेद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरील तक्त्यात दर्शविलेल्या हंगामाची पाणीपट्टी रक्कम रुपये ———– याप्रमाणे मागील थकबाकीवरील जादा आकारासह खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे तुमच्याकडून येणे आहे. सदर रक्कम महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ च्या कलम ८८ प्रमाणे नोटीस प्राप्त झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत उपविभागीय कार्यालय कुकडी डावा कालवा उपविभाग क्र. १२ येथे भरणे आवश्यक आहे. जर ही रक्कम वरील मुदतीत भरली नाही तर आपणास थकबाकीदार म्हणून यापुढील पाणीपुरवठा मंजूर केला जाणार नाही. त्याशिवाय पाणीपट्टीच्या थकीत रकमेवर १० टक्के जादा आकार वसूल करण्यात येईल. तसेच थकित रक्कम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १७६ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पद्धतीने सक्तीच्या उपायाने वसूल करण्यात येईल.
दहिगाव सिंचन योजनेचे आवर्तन सुरू असून पाणी पातळी कमी झाल्याने वेग मंदावला आहे. पाणी टेलपर्यंत पोहोचण्यासाठी काय त्रुटी आहेत, याची पाहणी सुरू आहे. शेतकऱ्यांना पाठवलेल्या नोटीस या आंदोलनाच्या निवेदनापूर्वीच काढलेल्या असून आंदोलन आणि नोटिसा यांचा काहीही संबंध नाही.
-कनिष्ठ अभियंता सौंदाणे,
दहीगाव उपसा सिंचन योजना.
.
.