बागलांचा कौल ठरवणार आदिनाथचा कारभारी; तठस्थ भूमिकेमुळे रिंगणातील गटांत अस्वस्थता…


करमाळा, विशाल परदेशी – तालुक्यातील बंद पडलेल्या आदिनाथ सह.सा. कारखान्याच्या निवडणुकीसाठी कोण धजावणार असा पूर्वानुमान जाणकारांकडून सुरुवातीला वर्तवला जात होता. करमाळा कृ. उ. बाजार समिती प्रमाणे अकलूजकरांच्या वाड्यावर आदिनाथचे संचालक मंडळ बिनविरोध निवडले जाणार, अशा भ्रमात असणाऱ्या तालुका वासियांच्या भ्रमाचा भोपळा आदिनाथसाठी तीन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर फुटला आहे. पॅनल जाहीर होताच आपापल्या पद्धतीने या गटांनी प्रचार सुरू केला असला तरी प्रचार संपण्यास अवघे दोन दिवस राहिले असताना बागल गटाची भूमिका जाहीर नसल्याने त्यांच्या भूमिकेबाबत तालुक्यात चर्चा रंगू लागल्या असून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान मागील आठवड्यात आजी-माजी आमदारांच्या गटांच्या प्रचार सभांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते. मात्र बागल गटाच्या तठस्थ भूमिकेमुळे आजी-माजी आमदारांच्या गोटात अस्वस्थता असून त्यामुळे प्रचार कार्यात मरगळ आल्याचे दिसून येत आहे.

सर्वप्रथम माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या महायुती आदिनाथ बचाव पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटला आणि यानंतर तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या सभांमध्ये संजयमामा शिंदे हे आदिनाथ चालवण्यासाठी कशाप्रकारे सक्षम आहेत हे सभासदांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून झाला. मात्र विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या आदिनाथ कारखाना संजीवनी पॅनलच्या प्रचार सभांमध्ये कारखान्याबाबत पुढील धोरण सांगण्याऐवजी नुकताच स्वतःच्या मालकीच्या म्हैसगाव साखर कारखाना विकलेले शिंदे आदिनाथ कसा चालवणार असा सवाल करत प्रचारात शिंदे गटाची खिल्ली उडवण्यास सुरुवात झाली.

राजकीय व्यासपीठावर आतापर्यंत विरोधकांवरील वैयक्तिक टीका टाळलेल्या मा.आ. संजयमामांनी यावेळी मात्र दोन कारखाने विकलेल्यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करणारे काय कारखाना चालवणार, असा प्रतिप्रश्न करत सुरुवात केली. यानंतर पारेवाडी, चिकलठाण, कंदर, केम, रावगाव, जवळा, केतुर, उमरड आदी ठिकाणी झालेल्या सभांमध्ये उमेदवारांवर वैयक्तिक चिखलफेक सुरू राहीली. यामध्ये पाटील गटाकडून आमदार पाटील यांच्यासह माजी आमदार जयवंतराव जगताप, देवानंद बागल, सुनील तळेकर, वैभवराजे जगताप तर शिंदे गटाकडून मा. आ. शिंदे यांच्यासह सुभाष गुळवे, महेश चिवटे, ॲड. अजित विघ्ने, विवेक येवले, सुहास गलांडे आदी वक्त्यांनी सभा गाजवल्या. सदरचा कलगीतुरा गुरुवार पर्यंत रंगला असला तरी त्याच त्या मुद्द्यांमुळे सभासदांनीही या सभांकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले.

टीका टिप्पणी मुळे प्रचार भरकटत असल्याचे लक्षात आल्यानंतर महायुतीच्या बॅनरखाली निवडणूक लढवत असलेल्या शिंदे गटाने बागल गटाच्या तठस्थ भूमिकेकडे लक्ष केंद्रित केले तर आ. पाटील गटाकडून आदिनाथ पुनरुज्जीवित करण्याबाबत भूमिका मांडण्यास सुरुवात झाली. उमरड येथे झालेल्या सभेत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी शिंदे सेनेच्या दिग्विजय बागल यांनी स्वतःचा निर्णय घेऊन महायुतीच्या आ. शिंदे गटाला निवडून देण्याचे आवाहन केले आहे.

आजी-माजी आमदारांनी कितीही नेटाने प्रचार केला तरी आदिनाथच्या बहुसंख्य सभासदांची फळी बागल गटाच्या पाठीशी असल्याने आदीनाथच्या या निवडणुकीत बागल गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. दिवंगत माजी मंत्री दिगंबरराव बागल यांच्या काळापासून मोहिते पाटलांशी बागल गटाची जवळीक आहे. खा. धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार नारायण पाटील हे महाविकास आघाडीत आहेत. त्यामुळे आमदार पाटील यांच्या आदीनाथ संजीवनी विकास पॅनलला बागलांची मदत होईल असा एक मतप्रवाह असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मकाईला केलेल्या मदतीमुळे बागल गटाला महायुतीच्या बॅनरखाली आदिनाथची निवडणूक लढणाऱ्या माजी आमदार शिंदे यांनाच पाठबळ द्यावे लागेल, असा एक मतप्रवाह सध्या तालुक्यात चर्चिला जात आहे.

शेवटी काहीही झाले तरी ज्या गटाला बागलांची मदत होईल तोच गट आदिनाथचा कारभारी होणार, हे मात्र निश्चित आहे.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page