सुयश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेत हिरवा चारा आणि वृद्धाश्रमात वॉकरची भेट…



करमाळा, प्रतिनिधी – सण, उत्सव, समारंभ यांचा मूळ सांस्कृतिक हेतू बाजूला ठेवून वारेमाप खर्च करणे हे आज प्रतिष्ठेचे मानले जाते. मात्र शहरातील सुयश संजय पाटील या तरुणाने अशा वायफळ खर्चाला फाटा देऊन आपल्या वाढदिवसानिमित्त गोशाळेला हिरवा चारा तर वृद्धाश्रमाला वॉकरची भेट दिली आहे.

नैमित्तिक कारणे काढून आजची तरुणाई विविध सण उत्सव साजरा करत असताना वायफळ खर्च करत असल्याचे नेहमी पाहण्यात येते. मध्यरात्री मित्रांचा मेळा जमवून मोटारसायकलवर महागडा केक तोंडाला फासने, मोठ्या आवाजाचे फटाके उडवणे, ओली/ सुकी पार्टी करणे आदी निरर्थक प्रकार वाढदिवसानिमित्त होताना दिसतात. मात्र शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा.संजय महादेव पाटील यांचे चिरंजीव सुयश संजय पाटील यांनी आपला २१ वा वाढदिवस साधेपणाने साजरा करत शहरातील पांजरपोळ गोरक्षण संस्थेच्या गोशाळेला हिरवा चारा दिला. यासोबतच पांडे रोडवरील मातोश्री वृद्धाश्रमातील वयोवृद्धांसाठी अतिशय गरजेचे असणारे वॉकर देऊन वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे.

सुयशच्या या संकल्पनेला त्याच्या मित्रांनी साथ देऊन केक, हार-तुरे, फटाके आदी कुठलाही वायफळ खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत सामाजिक बांधिलकी जपत गोशाळेला चारा आणि वृद्धाश्रमाला वॉकर भेट दिल्यामुळे त्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

सण-समारंभात दान करणे ही भारतीय संस्कृती आहे. सुयश यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ऐन उन्हाळ्यात गोशाळेतील गोमातांना हिरव्या चाऱ्याचे दान करून गोमातेचा आशीर्वाद प्राप्त केला आहे. सुयशच्या या उपक्रमाचा आदर्श तरुणाईने घेणे अपेक्षित आहे. सामाजिक बांधिलकी सोबतच एक पुण्य कर्म आपल्या हातून घडण्यासाठी शहर व तालुक्यातील दानशुरांनी पांजरपोळ गोरक्षण संस्थेला मदत करावी.
-भरतकुमार गांधी,
अध्यक्ष, पांजरपोळ गोरक्षण संस्था, करमाळा.

मातोश्री वृद्धाश्रमाच्या माध्यमातून वयोवृद्धांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. शहरातील दानशुरांचेही वृद्धाश्रमास नेहमी सहकार्य राहते. मात्र सुयशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या मातोश्री वृद्धाश्रमास तरुणाईच्या रूपाने पहिलीच मदत मिळालेली आहे. तरुण पिढीने सामाजिक भान ठेवून वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता सुयश प्रमाणे सामाजिक बांधिलकीही जपावी.
-बाळासाहेब गोरे,
संस्थापक, मातोश्री वृद्धाश्रम, पांडे, ता. करमाळा.

.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page