आळसुंदे-वरकुटे रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; राणा वाघमारे यांचे जेसीबी वर चढून शोले स्टाईल आंदोलन…
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील आळसुंदे-वरकुटे शिव रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या रस्त्यावरील अतिक्रमणा विरोधात शुक्रवार दि. ११ रोजी सामाजिक कार्यकर्ते राणा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आळसुंदे ग्रामस्थांकडून करमाळा-कुर्डूवाडी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वाघमारे हे जेसीबीच्या खोऱ्यात उंचावर जाऊन बसल्याने या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आलेल्या प्रशासन प्रतिनिधींची दमछाक झाली.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता शेतीसाठी पर्यायी रस्ता अथवा शिव रस्त्या विषयी ठोस आश्वासन दिल्याशिवाय रस्त्यावरून न उठण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. वाघमारे हे जेसीबी वर चढून बसल्याने तहसील प्रशासनाच्या वतीने आलेल्या मंडलाधिकारी श्रीमती काझी आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून समजूत काढण्याचा प्रयत्न करणारे स.पो.नि. रोहित शिंदे यांच्यात बराच वेळ चर्चा होऊ शकली नाही. यावेळी मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल हे सुद्धा या आंदोलनात सामील झाले. बराच वेळ हीच परिस्थिती राहिल्याने वाघमारे यांना खाली घेण्यासाठी करमाळा नगरपालिकेचे अग्निशामक वाहन आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी अग्निशामक वाहन अंगावर घालण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले.
दरम्यान दुपारी एक वाजता तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी आंदोलन स्थळी धाव घेत वाघमारे यांच्यासह आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी शिव रस्त्या अभावी येणाऱ्या अडचणी तहसीलदार ठोकडे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. सर्वांचे म्हणणे ऐकून घेत सक्षम अधिकाऱ्यांना घेऊन दि. १५ एप्रिल रोजी आळसुंदे व वरकुटे गावाचे गाव नकाशासह शिवरस्त्याच्या हद्दी व खुणा निश्चित करून शिवरस्ता खुला करून देण्याबाबतचे लेखी आश्वासन तहसीलदार ठोकडे यांनी दिले आणि तब्बल साडेतीन तास चाललेले हे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनाच्या वतीने ६० ते ७० पोलीस कर्मचाऱ्यांचा फौज-फाटा तैनात करण्यात आला होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अश्रु धुराचा वापर करण्याची तयारीही करण्यात आली होती. भर उन्हात झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनासह या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची दमछाक झाली. मात्र आंदोलनकर्त्यांनी ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय माघार घेतली नाही.
या आंदोलनासाठी जोतीराम घाडगे, संजय धारेकर, शहाजी घाडगे, अभिमान घाडगे, श्रीकांत येवले, सचिन सरवदे, शहाजी देवकते, अशोक घाडगे, तात्या सरडे, आगतराव बेडकुते, गणेश टकले, किशोर शिंदे, रामराजे डोलारे, गणेश भांडवलकर, बालाजी घाडगे, रामभाऊ हांडे, गणेश देवकते, अतुल माने, नवनाथ सरवदे, गणेश माने, जयसिंग घाडगे, अक्षय घाडगे, परम मोरे, जयसिंग पाटील, नाना मोरे, अनिकेत घाडगे, राजू देवकते, आबा देवकते, महावीर घाडगे, श्रीराम पाडूळे, शुभम सपकाळ यांच्यासह बहुसंख्य महिला व आळसुंदे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
.