बाष्कळ गप्पा मारण्यापेक्षा हिंमत असेल तर आमने-सामने चर्चेला या; आदिनाथविषयी संजयमामांचे विरोधकांना खुले आव्हान…
करमाळा, प्रतिनिधी – आदिनाथ कारखाना पुन्हा जोमाने सुरू करण्याबाबत आपल्याकडे काय नियोजन आहे आणि आपले काय व्हिजन आहे, हे मतदार-जनतेला कळण्यासाठी विरोधकांनी हिंमत असेल तर आमने-सामने चर्चेला यावे,असे खुले आव्हान माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी विरोधकांना दिले आहे. शुक्रवार दि. ११ रोजी महायुती आदीनाथ बचाव पॅनलच्या उमरड येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
१७ एप्रिलला होत असलेल्या आदिनाथ सह. सा. कारखान्याच्या निवडणुकीत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती आदिनाथ बचाव पॅनलविरुद्ध आमदार नारायण
पाटील यांचा संजीवनी पॅनल असा दुरंगी सामना होत आहे. यावेळी बोलताना संजयमामा म्हणाले की, आदिनाथच्या सत्तेत आळीपाळीने सहभागी झालेल्या विरोधकांनी १९९९-२००० मध्ये कर्जमुक्त झालेला हा कारखाना पुढील काळात कर्जाच्या वाढत्या बोजामुळे अखेर बंद पाडला. तालुक्यातील ऊस उत्पादक सभासदांच्या जिव्हाळ्याचा, अस्मितेचं प्रतीक असलेला, साईटच्या चारी बाजूला हाकेच्या अंतरावर मुबलक ऊस उपलब्ध असलेला, तालुक्यातील हा पहिला सहकारी कारखाना रसातळाला का गेला, याचंही खरं आणि नेमकं उत्तर विरोधकांनी द्यावे. यापुढे तरी कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत आणि कारखान्याला कर्जमुक्त करून पूर्वस्थितीत आणण्यासाठी आपल्याकडे काय नियोजन आहे, आपलं काय व्हिजन आहे हे सभासद-मतदारांना सांगण्याऐवजी विरोधक निवडणूक मूळ मुद्द्यापासून भरकटविण्यासाठी नेहमीप्रमाणे बिनबुडाचे, निराधार आणि निरर्थक आरोप करत आहेत.
असे बिनबुडाचे आणि आचरट, बालिश, बुद्धीहीन आरोप करून जनतेची करमणूक करण्याऐवजी हिंमत असेल तर समोरासमोर येऊन आदिनाथ पुन्हा सुरू करण्याबाबत आपल्या योजनांबाबत मुद्देसूद चर्चा करावी, असे जाहीर आव्हान शिंदे यांनी विरोधकांना केले आहे.
.
.
.