पोटेगाव बंधाऱ्याचे काम अजून का सुरू नाही ? महायुतीचे उमेदवार विनय ननवरे यांचा आ.नारायण पाटील यांना सवाल…


करमाळा, प्रतिनिधी – आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीमध्ये विकास कामांचा मुद्दा अग्रक्रमाने मांडला जात आहे. २०१९ ते २४ या कार्यकाळामध्ये माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून ३४९० कोटीची विकास कामे मतदार संघामध्ये मंजूर केलेली होती. त्यातील बरीचशी कामे त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर २०२५ मध्ये सुरू झाली. परंतु या विकास कामांमध्ये आडकाठी घालण्याचा प्रयत्न विद्यमान आमदारांकडून सुरू असून पोटेगाव बंधाऱ्याचे काम अजून का सुरू नाही? असा सवाल महायुती आदिनाथ बचाव पॅनलचे उमेदवार तथा बोरगावचे सरपंच विनय ननवरे यांनी आमदार नारायण पाटील यांना विचारला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना ननवरे म्हणाले की, तालुक्यातील सीना नदीवरील पोटेगाव येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ८ लाख निधीस मान्यता मिळून बंधाऱ्याचे भूमीपूजन आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर सत्तापालट झाल्यामुळे या कामाला खीळ बसली. या बंधार्‍याचा फायदा पोटेगाव, बाळेवाडी पोथरे, बिटरगाव श्री, तरटगाव, निलज या ६ गावांना होणार असून एकूण ८१५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पोटेगाव या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम १९९० च्या दरम्यान पूर्ण झाले. तेव्हापासून हा बंधारा दुरूस्तीच्या प्रतिक्षेत होता. ३५ वर्षाच्या कालावधीत अनेक आमदार / खासदार होऊन गेले, परंतु कुणालाही तो प्रश्न सोडवता आला नाही.

हा जटिल प्रश्न संजयमामा शिंदे यांनी सोडवला, परंतु केवळ राजकीय कुरघोडी करण्याच्या हेतूने हे काम नारायण पाटील यांनी अडवून ठेवले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने तुम्हाला मतदार संघाचे भले करता येत नसेल तरी किमान वाईट तरी करू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया संजीवनी पॅनलच्या प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांनीही बोलून दाखवली आहे.

आ.नारायण पाटील यांनी रोखून धरलेले सदर बंधाऱ्याचे काम तात्काळ सुरू न झाल्यास आपण लवकरच मोठे जनआंदोलन उभा करू, असा इशारा विनय ननवरे यांनी दिला आहे.

.

.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page