शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसाठी प्रहार संघटनेचे जेऊर येथे मशाल आंदोलन…
शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव आणि दिव्यांगांना पेन्शन वाढीची मागणी
करमाळा, प्रतिनिधी – शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव आणि दिव्यांग बांधवांना ६००० रुपये पेन्शन या मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने तालुक्यातील जेऊर येथे मशाल आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचा आसूड लिहिणारे महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी हातात भगवा ध्वज आणि गळ्यात निळा गमछा घालून हे आंदोलन करण्यात आले.
शेतकरी कर्जमाफी, पेरणी ते कापणीपर्यंत खर्च MREGS मधून करावा, दिव्यांग बांधवांना ६०००/- रूपये मासिक मानधन देण्याच्या मागणीसाठी प्रहारचे संस्थापक बच्चु कडू यांनी शुक्रवार दि. ११ रोजी रात्री ९ वाजता राज्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. या आदेशानुसार तालुक्यातील प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार नारायण पाटील यांच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्याच्या तयारीत असतानाच करमाळा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या आंदोलनकर्त्यांना जेऊर बायपास येथेच अडवले. यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर यांना आमदार नारायण पाटील यांच्या नावे मागण्यांबाबतचे निवेदन दिले.
यावेळी प्रहार करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, सोलापूर जिल्हा सरचिटणीस बापू तळेकर, तालुका उपाध्यक्ष पप्पू ढवळे, अशोक तळेकर, केम ग्रामपंचायत उपसरपंच सागर कुरडे, मधुकर अवघडे, पांडुरंग गुटाळ, सागर कारंडे, सोनू कुरडे, बापू गलांडे यांच्यासह प्रहार संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आसमानी संकट व वाढत्या महागाईने शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाला आहे. निवडणुकीपूर्वीच्या जाहीरनाम्यात संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिलेले आमदार निवडणुकीनंतर कर्जमाफीबद्दल विधानसभेत चकार शब्द बोलत नाहीत. त्यामुळे बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने हातात भगवा ध्वज, गळ्यात निळा दुपट्टा व पेटती मशाल घेवुन आम्ही कर्जमाफी, हमीभाव आणि दिव्यांगांना पेन्शनवाढीसाठी हे आंदोलन केले आहे.
-संदीप तळेकर,
तालुकाध्यक्ष, प्रहार जनशक्ती संघटना.
.
.
.