देवळालीचा राणा आणि निर वांगीचा ब्लेंडर यांनी पटकावला ‘कमलाई केसरी’ चा बहुमान…
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील पांडे येथे ‘कमलाई केसरी’बैलगाडा शर्यत उत्साहात पार पडली. गुरुवार दि. १० रोजी पार पडलेल्या या शर्यतीत राज्यभरातून १५० बैलगाडे सहभागी झाले होते. येथे पै. जयराम तात्या सोरटे मित्र परिवाराच्या वतीने गोरख बापू कोळेकर यांनी या शर्यतीचे आयोजन केले होते. यावेळी करमाळा तालुक्यातील इंदापूर तालुक्यातील देवळाली येथील शिवन्या लक्ष्मण ढेरे यांचा राणा आणि निर वांगी येथील आदत ब्लेंडर या जोडीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.
गुरुवारी सकाळी दहा वाजता विहाळ येथील भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक किरण तात्या सावंत यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. एकूण फेऱ्यांतून सेमी फायनलमध्ये गेलेल्या २९ बैलगाड्यांतून ७ बैलगाड्यांमध्ये फायनल शर्यत घेण्यात आली. यात इंदापूर येथील दीपक सातपुते आणि जाधव वाडी येथील जाधव यांचा वादळ याचा दुसरा तर सराफ टाकळी येथील भैया नगरे आणि उरुळी कांचन येथील श्रेयांश कांचन यांच्या बाजी या आदतने तृतीय क्रमांक मिळवला आहे.
हजारो शर्यतप्रेमींनी या थरारक शर्यतीचा आनंद घेतला. आमदार नारायण पाटील, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी या शर्यतीस उपस्थित राहून आयोजकांचे कौतुक केले. शर्यतीचे यंदाचे पहीलेच वर्ष होते. या स्पर्धेतील विजेत्यांना लाखोंची बक्षिसे देण्यात आली. झांजुर्णे तात्या, विकास जगदाळे (सर), मयूर तळेकर आणि मातोश्री वृद्धाश्रमाचे संचालक बाळासाहेब गोरे (गुरुजी) यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक केले आहे.
.
.
.
.