वरिष्ठांच्या बनावट सहीच्या आधारे आरोपीचे नाव दोषारोप पत्रातून वगळले; करमाळ्याच्या तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल…
करमाळा – तपासीय अंमलदाराने गुन्हयातील घटनेच्या वेळी आरोपी घटनास्थळावर होता की नाही, याबाबतचा पुरावा निष्पन्न न करता त्याचे नाव दोषारोप पत्रातून वगळले. तसेच उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याच्या बनावट सहीचे दोषारोप मंजुरीचे पत्र तयार करून आरोपीला तपासात सहकार्य केल्याच्या आरोपावरून आणि उपविभागीय अधिकाऱ्याच्या पुर्वपरवानगी शिवाय न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केल्याच्या आरोपावरून करमाळा पोलीस स्टेशनच्या तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षकावर करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस शिपाई गणेश महादेव शिंदे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशान्वये दि.०१/०२/२०२५ रोजी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, करमाळा पोलिसांत दाखल असलेल्या गु.र.नं. 946/2023 या गुन्ह्याच्या तपासामध्ये तपासीय अंमलदार स.पो.उप.निरी. संजय जाधव यांनी गुन्हयातील आरोपी सुहास रामचंद्र साळुंखे यास गुन्हयाच्या दोषारोपातून वगळुन आरोपपत्र दाखल केले. तसेच आरोपीने प्राथमिक आरोग्य केंद्र, टेंभूर्णी येथे दि. 09/12/2024 रोजी उपचार घेतलेल्या माहितीत तफावत दिसुन आलेली आहे. यासोबतच उपविभागीय पोलीस अधिकारी (करमाळा उपविभाग) यांच्या सहीचे बनावट दोषारोपपत्र मंजुरीचे पत्र तयार करुन ते करमाळा पोलीसांत सादर केला आणि गुन्हयाचा दोषारोप नंबर घेवुन ते उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पुर्वपरवानगी शिवाय न्यायालयात दाखल केले. यावरुन तपासीय अंमलदार स.पो.उप.निरी. संजय जाधव (सध्या नेमणूक अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे) यांनी गुन्हयाच्या तपासात सहकार्य केल्याचे दिसुन येत आहे. या अनुषंगाने त्यांच्यावर योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश प्राप्त झाल्याने फिर्याद देत आहे.
पो.शि. शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी आणि तत्कालीन स.पो.उप.निरी. संजय जाधव यांच्यावर करमाळा पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. स.पो.नि. पी. बी. टिळेकर हे याबाबत पुढील तपास करत आहेत.
.
.
.
.
.
.
.
.