रिटेवाडी उपसा सिंचन योजनेची बैठक पुढे ढकलली…
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसंदर्भात मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित केलेली सोमवार दि.३ फेब्रुवारी रोजीची बैठक रद्द झाली असून ती १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान घेतली जाईल, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक जयदीप पवार यांनी ही माहिती जिल्हाप्रमुख चिवटे यांना दिली आहे.
करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह तालुक्यातील प्रमुख आजी-माजी पदाधिकाऱ्यांना या बैठकीचे आमंत्रण न दिल्या गेल्यामुळे ही मीटिंग पुढे ढकलली गेल्याची चर्चा आहे. या बैठकीला लाभार्थी सर्व गावांचे सरपंच व आजी-माजी पदाधिकारी, शिवसेना-भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात यावे, अशी मागणी काही जणांनी जलसंपदा मंत्री विखे यांच्याकडे केलेली असल्याचे समजते आहे.
दरम्यान १३ किंवा १४ फेब्रुवारीला पुन्हा या संदर्भात बैठक घेऊ, असे जलसंपदा खात्याकडून कळविण्यात आले आहे.
.
.
.
.
.