करमाळा पोलिसांकडून शहर व तालुक्यातील उत्कृष्ट गणेश मंडळांना बक्षिसांचे वितरण…
करमाळा, विशाल परदेशी – २०२४ च्या गणेशोत्सवात सोलापूर ग्रामीणच्या करमाळा पोलीस स्टेशनच्या वतीने शहर व तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळांसाठी उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या निकषास पात्र ठरलेल्या गणेश मंडळांना बक्षिस वितरणाचा समारंभ बुधवार दि.२९ रोजी तहसील आवारातील पंचायत समिती सभागृहात उत्साहात पार पडला.
उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि नायब तहसीलदार विजय लोकरे, करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक गजानन गुंजकर, गटविकास अधिकारी अमित कदम, मुख्याधिकारी सचिन तपसे, सहाय्यक निबंधक उमेश बेंढारी, सा. बां. विभागाचे उपअभियंता अभिषेक पवार, भुमी अभिलेख कार्यालय अधीक्षक सौ. प्रिया पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर व तालुक्यातील उत्कृष्ट गणेश मंडळांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या गणेशोत्सव स्पर्धेत शहरातील सावंत गल्ली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाने प्रथम क्रमांक, राशीन पेठ तरुण सेवा मंडळाने द्वितीय क्रमांक तर किल्ला विभाग येथील लोकमान्य टिळक तरुण मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
गेल्या ३९ वर्षांपासून शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने गणेशोत्सवासह शिवजयंती उत्सवात शहरातील जामा मस्जिद वरुन मिरवणुकांवर पुष्पवृष्टी करून प्रत्येक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान केला जातो. अशाप्रकारे सामाजिक सलोखा राखल्या बदल सकल मुस्लिम समाजाचे शहराध्यक्ष जमीर कासम सय्यद यांचा तसेच गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल शहरातील सरकार मित्र मंडळाचा विशेष गौरव या समारंभात करण्यात आला.
करमाळा ग्रामीणच्या जिंती दूर क्षेत्रामधून वाशिंबेच्या भैरवनाथ तरुण मंडळास प्रथम, सावडीच्या विघ्नहर्ता गणेश मंडळास द्वितीय तर कोंढार-चिंचोली येथील मोरया तरुण मंडळास तृतीय, केम दूर क्षेत्रात केम येथील व्यापार पेठेच्या टिळक मित्र मंडळास प्रथम, शिव प्रतिष्ठान (केम)ला द्वितीय तर शेलगाव येथील शिव शंभो मित्र मंडळास तृतीय, कोर्टी-रावगाव दुर क्षेत्रातील कोर्टीच्या शिव गणेश मित्र मंडळाला प्रथम, मांगी येथील जय बजरंग तरुण मंडळास द्वितीय तर हिवरवाडी येथील राजमाता ग्रुपला तृतीय तसेच साडे-पांडे दूर क्षेत्रात सालसे येथील पैलवान ग्रुपला प्रथम, फिसरेच्या शिवसाम्राज्य युवा प्रतिष्ठानला द्वितीय तर कोळगाव येथील जय भवानी तरुण मंडळ तृतीय आणि जेऊर दूर क्षेत्रात जेऊर येथील अष्टविनायक मित्र मंडळास प्रथम, उमरडच्या जय भवानी तरुण मंडळास द्वितीय तर कोंढेज येथील काळभैरवनाथ गणेश मित्र मंडळास तृतीय क्रमांक मिळाला आहे.
यासोबतच या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिलेले प्रा.लक्ष्मण राख, ॲड.अपर्णा शिंदे-पद्माळे, संदिप शिंदे-पाटील, अशोक मुरूमकर, प्रदीप सुभाष बलदोटा यांचाही सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. पोलीस पाटील संघटनेचे ता.अध्यक्ष संदिप शिंदे-पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
.
.
.
.
.
.
.
.