धाराशिवच्या बॅंक कर्जवसुली पथकाची करमाळा तहसील मध्ये वर्दळ; तर्कवितर्कांना उधाण…


पश्चिम भागात वसुली पथकाने केलेल्या कारवाईचा फलक गायब
करमाळा, विशाल परदेशी – करमाळा तहसील कार्यालयात उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या वसुली पथकाची गेले दोन दिवस वर्दळ सुरू आहे. बँक प्रशासनासह तहसील प्रशासनाने ही याबाबत कमालीची गुप्तता पाळली असून यामुळे तहसील आवारात येणाऱ्या जाणकारांसह सामान्य जनतेच्या तर्कवितर्कांना उधाण आल्याचे चित्र आहे.

मंगळवार दि. २१ रोजी सकाळी लवकरच चार वाहनांतून उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे वसुली पथक करमाळा तहसील कार्यालयात येऊन धडकले. यावेळी या पथकाकडे सामान्यांचे फारसे लक्ष गेले नसले तरी दुपारपर्यंत हे पथक ताटकळल्याने या पथकाबाबत सामान्यांसह तहसीलमध्ये येणे जाणे असलेल्या जाणकारांसह पत्रकार मंडळीतही कुतूहल निर्माण झाले.

यानंतर मंगळवारी दुपारी या पथकाने तालुक्याच्या पश्चिम भागातील एका शेतजमिनीवर कारवाईचा भाग म्हणून बँकेच्या नावाने एक फलक उभा केला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सदर कारवाईबाबत माहिती देण्याचे टाळल्याने पत्रकारांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना संपर्क साधला असता त्यांनी कारवाई झाली असल्याचे सांगून माहिती पाठवणार असल्याचे सांगितले. मात्र मंगळवारी उशिरापर्यंत तहसील प्रशासनाकडून या कारवाईबाबत कुठलीही माहिती पत्रकारांना मिळाली नाही.

बुधवार दि. २२ रोजी सकाळी पुन्हा जादा कुमक मागवून पुढील कारवाईसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्ताच्या मागणीसाठी हे पथक करमाळा तहसीलमध्ये हजर होते. मात्र तहसीलदार शासकीय कामासाठी सोलापूर येथे गेले असल्याने दुपारपर्यंत पोलीस बंदोबस्त मागणीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान हे पथक शहरातील विद्यानगर भागातील राजकीय गटाच्या कार्यालयासमोर बराच वेळ थांबल्यामुळे पत्रकारांनी या ठिकाणी मुख्य वसुली अधिकारी शिंदे यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणत्याही कारवाईबाबत माहिती देण्याचे टाळले.

यानंतर हे पथक पुन्हा तहसील आवारातील पोलिस ठाण्यात आले. या ठिकाणी मंगळवारी कोर्टी येथे केलेल्या कारवाईचा फलक अज्ञातांनी उघडून टाकल्या बाबत तक्रार देण्याचे काम या पथकाकडून सुरू आहे.

गेल्या दोन दिवसांच्या या पथकाच्या करमाळ्यातील मुक्कामानंतर झालेल्या तर्कवितर्कांनंतर सदर पथक हे तालुक्यातील एका सहकारी कारखान्यावर असलेल्या कोट्यावधींच्या कर्ज वसुलीसाठी आले असून मंगळवारी झालेली कारवाई ही सदर कारखान्याच्या संचालकावर झाली असल्याची तसेच या कारखान्याशी संबंधित असलेल्या राजकीय गटाच्या खाजगी मालमत्तेवर कारवाई करण्याच्या प्रयत्नात असल्याची कुजबूज दबक्या आवाजात सुरू आहे.

दोन दिवस उलटूनही कर्ज वसुली पथकाला जुजबी कारवाई व्यतिरिक्त कोणतीही मोठी कारवाई करता न आल्याने तसेच याबाबतीत प्रशासनाकडूनही कमालीची गुप्तता पाळली जात असल्याने याप्रकरणी राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे बोलले जात आहे.

.

.

.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page