दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून चाकूहल्ला; नेरलेच्या चौघांवर गुन्हा दाखल…
करमाळा, प्रतिनिधी – नेहमीप्रमाणे दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून घरात एकटा असलेल्या प्रौढास चौघा मद्यपींनी घरात जाऊन चाकूसह लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. सोलापूर येथे उपचार घेऊन आल्यानंतर या घटनेतील जखमीने करमाळा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत करमाळा तालुक्यातील नेरले येथील गौस दस्तगीर पाटील (वय-५१ वर्षे) यांनी दि. १९/०१/२५ रोजी करमाळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १६/०१/२५ रोजी रोजी रात्री ८/३० च्या सुमारास गावातील संपत माणिक काळे, बाबा मधु काळे, शिवाजी जोतीराम दोंड आणि पृथ्वीराज उर्फ गोट्या कांतीलाल काळे (सर्व रा. नेरले ता. करमाळा) हे दारु पिवुन माझ्या घरी आले व “तु आम्हाला नेहमीप्रमाणे आता दारु पिण्याकरिता पैसे का देत नाही” असे म्हणु लागले. या चौघांपैकी संपत माणीक काळे याने “तुला लय मस्ती आली का? तु आमचे का ऐकत नाही?” असे म्हणुन त्याच्या हातातील चाकु माझे डाव्या हाताचे पोटरीवर मारुन जखमी केले. तसेच बाबा मधु काळे, शिवाजी जोतीराम दोंड, पृथ्वीराज उर्फ गोट्या कांतीलाल काळे यांनीही मला हाताने लाथाबुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळी, दमदाटी केली आहे.
गौस पाटील यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी वरील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून संपत माणिक काळे, बाबा मधु काळे आणि पृथ्वीराज उर्फ गोट्या कांतीलाल काळे या तिघांना आज सोमवार दि. २० रोजी ताब्यात घेतले आहे. तिघा आरोपींना उद्या (मंगळवारी) करमाळा न्यायालयासमोर उभे करण्यात येणार असून फरार असलेल्या शिवाजी जोतीराम दोंड याचा शोध करमाळा पोलीस घेत आहेत. सहा. पोलिस निरीक्षक रोहित शिंदे हे याबाबत अधिक तपास करत आहेत.
.
.
.
.
.
.
.