मांगी शिवारात बिबट्या??? वनविभागाचे अधिकारी उद्या पाहणी करणार…


करमाळा, प्रतिनिधी – व्हायरल व्हिडिओ द्वारे तालुक्यातील मांगी परिसरात गुरुवारी सायंकाळी उशिरा बिबट्या दिसल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात आलेला आहे. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे तो प्राणी बिबट्या नसल्याचा दावा करत शुक्रवारी सक्षम अधिकारी येऊन पाहणी करतील, असा निर्वाळा दिला आहे.

मांगी शिवारातील शरद शिंदे यांच्या क्षेत्रात गुरुवारी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी ऊस तोडणी कामगाराच्या अकरा वर्षाच्या दीपक कचरू ठाकरे याला बिबट्याचे दर्शन झाले असून त्याने त्याचा व्हिडिओ मोबाईल मध्ये काढला आहे. यानंतर मांगी गावात येऊन ही माहिती मांगी सोसायटीचे चेअरमन सुजित बागल यांना दिली. यानंतर सुजित बागल यांनी तात्काळ वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही माहिती दिली.

सदरच्या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी तेज वार्ता प्रतिनिधीने वनविभागाचे बाबासाहेब लटके यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आहे की, सदर व्हिडिओ लांबून आणि अस्पष्ट काढलेला असला तरी सदर बिबट्या सदृश्य प्राण्याची हालचाल बिबट्याप्रमाणे नसून प्रथम दर्शनी हा प्राणी मांजर वर्गीय म्हणजे रान मांजर असण्याची शक्यता आहे. सदर व्हिडिओ काढते वेळी वन विभागाचे वॉचमन गणपत जाधव यांच्या मुलानेही हा प्राणी प्रत्यक्ष पाहिल्याचे आणि तो मांजर वर्गीय म्हणजे रान मांजर असण्याची शक्यता वर्तवली आहे.

Advertisement


तरीही खबरदारीचा उपाय म्हणून उद्या शुक्रवार दि. १७ रोजी वन विभागाचे अधिकारी सदर ठिकाणच्या ठशांची पाहणी करून याबाबत अधिक माहिती घेतील असे लटके यांनी सांगितले आहे.

ऑगस्ट २०२४ पासून तालुक्यातील झरे, पोफळज, मांगी, वडगाव आदी ऊस बहूल भागात बिबट्या सदृश्य प्राण्याकडून शेळ्या, मेंढ्या, वासरे फस्त करण्याच्या घटना घडल्या आहेत. दरवेळी ग्रामस्थांकडून सदर प्राणी बिबट्या असल्याचे प्रत्यक्ष पाहिल्याचे बोलले जाते. मात्र व्हिडिओ किंवा फोटो उपलब्ध नसल्याने वन विभागाचे अधिकारी या दाव्यांना दुजोरा देत नाहीत. फक्त घटना घडलेल्या ठिकाणांना भेट देणे आणि ठशांचे मोजमाप घेऊन सदर प्राणी बिबट्या नसल्याचे सांगणे, असे प्रकार प्रत्येक वेळी होत आहेत. गुरुवारी घेतलेल्या व्हिडिओ बाबतही वन विभागाचे अधिकारी अशाच प्रकारे ठाम नसून उद्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या पाहणीनंतर काय निष्कर्ष निघतो याकडे बिबट्याच्या दहशतीने भयभीत असलेल्या मांगी परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

मांगी परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्या सदृश्य प्राणी वास्तव्यास असून त्याच्याकडून वारंवार शेळ्या मेंढ्या फस्त केल्या जात आहेत. गुरुवारी शरद शिंदे यांच्या शेतातील व्हिडिओ पाहिल्यानंतरही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर प्राणी बिबट्या नसल्याचीच शक्यता वर्तवली आहे. यापुढे पशुधनाची हानी झाल्यास वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल.
-सुजीत बागल.

मागील महिन्यापासून मांगी परिसरात बिबट्याचे वास्तव्य असताना सुद्धा वनाधिकारी सुस्त आहेत. व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवूनही वन अधिकारी जबाबदारी टाळून करमाळा तालुक्यात बिबट्या नसल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे अशा अधिकार्‍यांना बदलून नवीन कार्यक्षम वनाधिकारी करमाळ्याला द्यावेत.
-महेश चिवटे,
जिल्हाप्रमुख,शिवसेना.

तीन वर्षांपूर्वी करमाळा तालुक्यातील तिघांचा बळी बिबट्याने घेतला होता. धवलसिंह मोहिते पाटील यांनी या नरभक्षक बिबट्याचा बंदुकीने गोळी घालून अंत केला होता. आता तालुक्यात वास्तव्यास असलेले बिबटे नरभक्षक होण्याची वाट वनाधिकारी पाहत आहेत का, असा प्रश्न भयभीत शेतकरी उपस्थित करत आहेत.

.

.

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page