सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक फसवणूक प्रकरण: बँकेच्या तत्कालीन शाखाधिकार्यांसह आर्यन शुगरच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल…
बार्शी – बार्शी तालुक्यातील खामगांव येथील आर्यन शुगर प्रा.लि. या साखर कारखान्याच्या तत्कालीन चेअरमन सह संचालक आणि बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर फसवणूक सह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या बार्शी शाखेचे शाखाधिकारी राहूल लक्ष्मण खुने यांनी कोट्यावधींच्या कर्जाच्या फसवणुकीसंदर्भात ही फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत दि.०३/०१/२५ रोजी दिलेल्या फिर्यादीत खुने यांनी म्हटले आहे की, आर्यन शुगर प्रा.लि. यांना १८ सप्टेंबर २०१२ रोजी ५५ कोटी रुपये कर्ज मंजूर करण्यात आले होते. या कर्जासाठी गोडावुनच्या माध्यमातून साखर माल तारण म्हणून ठेवण्याची अट होती. बँकेने कर्जाची रक्कम मंजूर केली आणि कर्जाच्या अटीही स्पष्ट केल्या होत्या. मात्र, कारखान्याच्या संचालकांनी बँकेच्या गोडावुनमधील साखर विक्रीतून आलेली रक्कम बँकेच्या कर्ज खात्यात न भरता इतर कर्ज खात्यात भरली. यामुळे बँकेच्या मालतारण कर्ज खात्यात ४२,२५,४९,४८४ रुपये बाकी आहेत. त्यामुळे बँकेला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
या फिर्यादीवरून आर्यन शुगर प्रा.लि.चे संचालक योगेश सुधीर सोपल आणि त्यांची पत्नी, सुधीर गंगाधर सोपल आणि त्यांची पत्नी तसेच विलास दगडूअप्पा रेणके, अविनाश बसंतराव भोसले, श्रीकांत गोपाल नलवडे, राजू बसंतराव भोसले, बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी आर.एस. उबेरदंड आणि बँक इन्स्पेक्टर व्ही. एस. आगलावे यांच्यावर बार्शी शहर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०८, १०८, ४०९, १२० (ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
.
.
.
.
.
.
.