कोट्यवधींच्या शेअर मार्केट फसवणुकीतील आणखी दोन आरोपी जेरबंद…


नफ्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांना लावला होता चुना
करमाळा, प्रतिनिधी – शेयर मार्केट मध्ये पैसे लावून नफा कमावून देण्याचे आमिष दाखवून लोकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्याला अटक केल्यानंतर करमाळा पोलिसांनी या गुन्ह्यासंदर्भात आणखी दोघांना अटक केली आहे.

याबाबत करमाळा पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, करमाळा तालुक्यातील घोटी येथील रेवणनाथ लक्ष्मण ननवरे याने घोटी, केम सह पुणे, बेंगलोर येथील लोकांकडून पाच टक्के किंवा त्यापेक्षा अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली होती. सुरुवातीला काही जणांना आकर्षक परतावा देऊन त्याने सर्वांचा विश्वास संपादन केला. मात्र यानंतर अलीकडील काळात गुंतवणूकदारांना परतावा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ननवरे यांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच घोटी येथील बाळासाहेब पोपट राऊत यांनी करमाळा पोलीस स्टेशनला १९/०८/२४ रोजी गुन्हा दाखल केला होता.

यानंतर रेवणनाथने टेंभुर्णी-इंदापूर मार्गावरील उजनी पुलावर स्वतःची चारचाकी लावून आत्महत्या करत असल्याचा बनाव केला होता. मात्र पोलिसांनी योग्य तपास करत त्याला शिताफीने अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान करमाळा पोलिसांनी त्याचे इतर दोन साथीदार किशोर दिलीप ननवरे (वय-३७) व धनाजी बापू ननवरे (वय-४३, दोघेही रा. घोटी ता. करमाळा) यांना अटक करून त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना दि. ७/१२/२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पो.निरीक्षक रोहित शिंदे हे करत आहेत.

यासंदर्भात आणखी कोणाची आर्थिक फसवणूक झालेली असेल त्यांनी करमाळा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

.

.

.

.

.

.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page