करमाळ्यातील गटातटात पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या भरती ओहोटी मुळे तालुक्यातील राजकारणाला रंगत…



करमाळा, विशाल परदेशी – करमाळा माढा विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांसह अपक्षांकडून उमेदवारी स्पष्ट झाल्यानंतर स्थानिक पक्ष आणि गटातटातील नाराजी आणि त्यातून होणाऱ्या सोडचिठ्ठी आणि प्रवेशाने तालुक्याचे राजकारण ढवळून निघत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या गोटात होणाऱ्या भरती ओहोटीने करमाळा विधानसभेच्या निवडणूकीला रंगत येऊ लागली आहे.

लोकसभेपूर्वी भाजपा प्रवेश केलेल्या बागल गटाच्या दिग्विजय बागल यांनी सोमवार दि. २८ ऑक्टो. रोजी सायंकाळी उशिरा शिवसेनेत प्रवेश करून मंगळवारी महायुतीतून शिवसेना उमेदवार म्हणून उमेदवारी मिळवली आहे. यानंतर २०१९ च्या निवडणुकीत विद्यमान आमदार शिंदे यांच्या विजयासाठी निर्णायक ठरलेल्या मा.आ. जयवंतराव जगताप यांनी विधानसभा २०२४ च्या तोंडावर महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी (शप) पक्षाचे उमेदवार मा.आ. नारायण पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. दरम्यान ग्रामीण भागातील अनेक गावांतून एका गटाच्या उमेदवारांनी दुसऱ्या गटात प्रवेश करून त्या त्या गटाला खिंडार, भगदाड पाडून दुसऱ्या गटाला प्रबळ करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय मराठा समाजाच्या शैक्षणिक आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनांला वारंवार भेटी देत विविध आंदोलनांसाठी वाहने उपलब्ध करण्यासह तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रम राबविल्याचा हवाला देत अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या प्रा. रामदास झोळ यांनी जरांगे पाटील यांनी राज्याची विधानसभा निवडणुक लढवणार नसल्याचे जाहीर केले असले तरी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवून विधानसभा लढवण्याची वाटचाल सुरू ठेवली आहे.

मागील महिन्यात महायुतीत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी त्यांनी मतदार संघातील जनतेला आमदार शिंदे यांना पुन्हा आमदार करण्याचे आवाहन केले. मात्र शिंदे यांनी सुरुवातीला जाहीर केल्याप्रमाणे अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यांचा प्रचार करताना दिसून येत आहेत. शनिवारी महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांच्या प्रचारार्थ खा.धैर्यशील मोहीते पाटील, आ. रोहित पवार आदींच्या उपस्थितीत झालेल्या सभेत मुस्लिम समाजाचे अध्यक्ष उस्मान तांबोळी यांच्यासह करमाळा मतदार संघात येणाऱ्या माढा तालुक्यातील छत्तीस गावांपैकी अनेक गावातील कार्यकर्त्यांनी मा.आ. पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर इकडे भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी आदीनाथचे प्रशासकीय संचालक विलासराव घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यंतरी बॅकफुटवर गेलेल्या बागल गटात कार्यकर्ता मेळावे, गावभेटी आदींच्या माध्यमातून नवचैतन्य आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. महायुतीतून दिग्विजय यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे आणि पदाधिकाऱ्यांच्या साथीने स्व. दिगंबर बागल हे नाव पुन्हा विधानसभेत घुमवण्यासाठी सर्वस्व पणाला लावल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान २०१४ पासून आ.शिंदे गटाचे मानले गेलेल्या शहरातील सावंत गटानेही विद्यमान आ.शिंदेंशी फारकत घेत मंगळवार दि. ५ नोव्हेंबर रोजी नालबंद मंगल कार्यालयात मोठे शक्तिप्रदर्शन करत आणि मा.आ. पाटील, खा.मोहीते पाटील, मा.आ.जगताप यांच्यासह ॲड. राहुल सावंत, सुनील सावंत यांच्या सभा घेत महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सावंत गटाचा कार्यक्रम सुरू असतानाच इकडे भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवार आ. शिंदे यांना पाठिंबा दिल्याची आवई उठली. फेसबुक आणि व्हाट्सअप ग्रुप वर याबाबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरलही झाले. मात्र याबाबत जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा न देता वरिष्ठांशी चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. या सर्व घामाघूमीत दोन-तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील एका पारंपारिक गटातील विश्वासू कार्यकर्त्यांची फळी गटाच्या गटाच्या उमेदवारी बाबत नाराज असल्याची आणि दुसऱ्या उमेदवाराला जाऊन मिळणार असल्याची दबक्या आवाजात कुजबुज होती. मात्र संबंधित गटाकडून या कार्यकर्त्यांची वेळीच मनधरणी करुन समजूत काढण्यात आली.

शनिवारी झालेल्या करमाळा येथील सभेत राष्ट्रवादी शप पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांची लढत देवेंद्र फडणवीस यांच्याशी असल्याचे विधान केले होते. महायुतीतून प्रतीस्पर्धी शिवसेना उमेदवार दिग्विजय बागल यांच्या प्रचारात भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे आणि त्यांच्यासोबत असणारे इतर पदाधिकारी यांची अनुपस्थिती तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा अपक्ष उमेदवार आ.शिंदे यांच्या प्रचारातील सहभाग या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन अपक्ष उमेदवार आ.शिंदे यांच्या विजयासाठीच ही रणनीती आखली गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे.

एकूणच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यातील गटातटांसह पक्षीय राजकारण चांगलेच तापले आहे. गटातटातील तळ्यात-मळ्यात फारसे विचारात घेतले जात नसले तरी राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या संभाव्य भूमिकांबाबत सामान्य मतदार गंभीर चर्चा करत असताना दिसून येत आहेत.

.

.

.

.

.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page