गुडटच आणि बॅडटच ओळखणे आज काळाची गरज आहे -प्रा.अंजली राठोड श्रीवास्तव…
करमाळा, प्रतिनिधी – न.प.मुलामुलींची शाळा नं. ४ करमाळा येथे सखी सावित्री समिती सभा अंतर्गत मुलींसाठी नुकताच गुडटच आणि बॅडटच (मायेचा स्पर्श आणि घाणेरडा स्पर्श) ओळखणे हा कार्यक्रम राबविण्यात आला. चांगला स्पर्श आणि घाणेरडा स्पर्श कसा ओळखायचा? तो कोण करतो? कुठे केला जातो? याची सखोल व अभ्यासपूर्ण माहिती समुपदेशक अंजली श्रीवास्तव यांनी यावेळी मुलींना दिली.
पोक्सो कायदा (२०१२) संदर्भातही त्यांनी विद्यार्थिनींना माहिती देऊन घाणेरडा स्पर्श झाल्यावर सर्वप्रथम मोठ्यांने ओरडणे व नंतर सुरक्षित ठिकाणी पळणे, घरातील आईबाबांना लगेच सांगणे अशा महत्वपूर्ण गोष्टी कृतीतून दाखवून दिल्या. (बॅडटच) घाणेरडा स्पर्श कोणत्या चार ठिकाणी केला जातो हे ही विद्यार्थींना समजावून सांगितले.
इ. ३/४ थी च्या मुलींनी अगदी आत्मविश्वासाने या गोष्टी समजून घेतल्या. सचिव शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला टांगडे मॅडम यांनी सखी सावित्री समिती स्थापन करण्याचा उद्देश व मुलींसाठी संरक्षण याबाबत मार्गदर्शन केले.तसेच सदर समिती प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आली असे ही त्यांनी मत मांडले.
या कार्यक्रमात अंगणवाडीच्या मनिषा मांडवे, आरोग्य विभाग परिचारिका ज्योती भोसले, निंबाळकर ताई, माता पालक स्वाती बोकन, शिक्षिका आसाराबाई भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल दगडे, शिक्षक संतोष माने, मुसळे, दुधे दोनदोन विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ. चंद्रकला टांगडे यांनी आभार मानले.
.
.
.
.
.