करमाळा व इंदापूर तालुका दरम्यान जल वाहतुकीस तात्पुरती मान्यता; आमदार शिंदे यांची यशस्वी मध्यस्थी…
कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आषाढी वारीनंतर विशेष बैठक…
करमाळा, प्रतिनिधी – करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळाशी दरम्यान जलवाहतूक करणारी बोट बुडाल्यामुळे धरणावरील जलवाहतूक बंद करण्यात आली होती. परंतु उजनी धरण काठालगत असणारी करमाळा व इंदापूर तालुक्यातील गावांची यामुळे खूप मोठी अडचण होत होती. या दोन्ही तालुक्याला जोडण्यासाठी नव्याने महायुती सरकारने पूल मंजूर केला असून त्याचे कामे सुरू होण्यास अवधी आहे. दरम्यान या दोन तालुक्यातील दळणवळण व्यवस्थित व्हावे, यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मध्यस्थीने उजनी धरणावरील जलवाहतूक तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली असून लवकरच यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती कुगाव दूध संस्थेचे चेअरमन सचिन गावडे यांनी दिली आहे .
याविषयी अधिक माहिती देताना गावडे म्हणाले की, करमाळा व इंदापूर तालुका उजनीकाठावरील नागरिकांनी सोमवारी आमदार संजयमामा शिंदे यांची भेट घेऊन तेथील नागरिकांच्या व्यथा बोलून दाखवल्या. त्यावेळी आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच प्रांत अधिकारी, तहसीलदार, करमाळा व इंदापूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक, भीमानगर उजनी धरण व्यवस्थापन अधिकारी मोरे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे साळे यांना तात्काळ फोन करून याविषयी तोडगा काढण्याचे सुचविले. त्याला अनुसरून विद्यार्थी तसेच रुग्ण अशी अत्यावश्यक बाब लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात लाईफ जॅकेटचा वापर करून जलवाहतूक करण्यास मान्यता दिली गेली आहे.
यामुळे करमाळा व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा वाहतुकीचा प्रश्न तात्पुरता सुटला असून या याविषयी कायमस्वरूपी मार्ग काढला जाणार असल्यामुळे दोन्ही तालुक्यातील उजनी धरणकाठा लगतचे नागरिक समाधानी असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. ही जलवाहतूक सुरू होण्यासाठी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तामामा भरणे यांचेही विशेष प्रयत्न असून त्यांच्या माध्यमातूनही इंदापूर तालुक्यातील प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत.
.
.
.
.
.
.