व्यसनी तरुणांची रात्रीच्या वेळी करमाळा बस स्थानकात दहशत; अपंग आणि वृद्ध व्यक्तीस बेल्टने अमानुष मारहाण…
पोलिसांनी दखल घेण्याची मागणी…
करमाळा, विशाल परदेशी- रात्रीच्या वेळी काही व्यसनी तरुण नशा करून धिंगाणा घालत करमाळा बसस्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना त्रास देत असल्याचा प्रकार शुक्रवार रात्री साडेदहाच्या सुमारास निदर्शनास आला. या आणि अशा अनेक समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या प्रवाशांना करमाळा आगाराकडून सहकार्याची अपेक्षा नसली तरी निदान पोलिसांनी तरी याबाबत दखल घेऊन या व्यसनी तरुणांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रात्रीच्या वेळी ही घटना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी केली आहे.
शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बसस्थानकातून ओरडण्याचा आवाज येत असल्याने बस स्थानकाबाहेर असलेले काही रिक्षा चालक आणि जेवणानंतर शतपावली साठी आलेल्या काही तरुणांनी हा प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी बसस्थानकात धाव घेतली. त्यावेळी एक तरुण त्याच्या साथीदारांसह बसस्थानकावर बस चुकल्यामुळे अडकलेल्या काही प्रवाशांना आणि निराधार असल्याने बसस्थानकाचा आश्रय घेत झोपलेल्या काही वृद्धांना त्रास देत असल्याचे दिसून आले. सुरुवातीला या तरुणाने परंडा येथे जाणारी बस चुकल्याने बसस्थानकावर थांबलेल्या एका अपंग व्यक्तीच्या कुबड्या हिसकावून त्याची थट्टा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कृत्याला विरोध केल्यामुळे सदर व्यसनी तरुणाने कमरेच्या बेल्टने त्याला मारहाण केली. यानंतर आजूबाजूच्या फलाटावरील झोपेत असलेल्या वृद्धांच्या अंगावरील घोंगड्या ओढत त्यांना जागे करून त्यांनाही बेल्टने मारहाण केली. दरम्यान हा गोंधळ पाहून जमा झालेल्या तरुणांना पाहून या विष्णू तरुणाने आपल्या साथीदारांसह बसस्थानकावरून पळ काढला. या मारहाणीत निराधार असल्यामुळे बसस्थानकावर झोपत असलेल्या वृद्ध व्यक्तीने कमरेवर बेल्टचा जोराचा फटका बसल्याचे तसेच दररोजच हा तरुण असा त्रास देत असल्याचे सांगितले.
अशाप्रकारे मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन करून रात्रीच्या वेळी बसस्थानकावर थांबलेल्या प्रवाशांना अमानुष मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या व्यसनी टोळक्याचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
.
.
.
.
.
.