थकीत ऊस बिले एफआरपी प्रमाणे १५ टक्के व्याजासह न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करणार -प्रा. रामदास झोळ…
करमाळा, प्रतिनिधी – १० जुलै पर्यंत शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले एफ.आर.पी प्रमाणे १५ टक्के व्याजासह मिळावीत यासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी करमाळा तहसील कार्यालयात निवेदन दिले आहे. अन्यथा १२ जुलै रोजी सकाळी १२ वाजता तहसील कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करणार असल्याचा इशाराही प्रा. झोळ यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत बुधवार दि. ३ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील कमलाई साखर कारखाना (पांडे), मकाई सहकारी साखर कारखाना (भिलारवाडी), भैरवनाथ साखर कारखाना (विहाळ) या चारही साखर कारखान्यांनी गाळप हंगाम 2021-22, 2022-23, 2023-24 मध्ये शेतकऱ्यांनी सदर कारखान्यांना गाळपासाठी ऊस दिला होता. २०२४ चा जून महिना उलटून गेला तरी अद्यापही ही बिले एफ.आर.पी. प्रमाणे शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत.
तालुक्यातील कारखाने आणि शेतकऱ्यांची येणे बाकी…
1. अदिनाथ स.सा. कारखान्याकडून शेतकऱ्यांची 2023-24 ची थकीत ऊसबिले एफ. आर.पी प्रमाणे 15% व्याजासहीत येणे बाकी आहेत.
2. कमलाई साखर कारखान्यकडून 2023-24 ची थकीत ऊस बिले एफ.आर.पी प्रमाणे 15 % व्याजासहीत येणे बाकी आहेत.
3. मकाई स.सा. कारखान्याकडून 2021-22 ची एफ.आर.पी प्रमाणे उसबिल 15% व्याजासहीत येणे बाकी आहेत तर 2022-23 ची एफ.आर.पी. प्रमाणे ऊसबिले 15% व्याजासहीत येणे बाकी आहेत. तसेच वाहनमालकांचे वाहतुक, कमीशन, डिपॉझीट येणे बाकी आहे. कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारी ही देणे बाकी आहेत.
4. भैरवनाथ साखर कारखान्याकडून 2023-24 ची थकीत ऊसबिले एफ.आर.पी प्रमाणे 15% व्याजासहीत येणे बाकी आहेत.
बुधवार दि. १० जुलै पर्यंत व्याजासह ही बिले मिळाली नाहीत तर शुक्रवार दि. १२ जुलै रोजी सकाळी १२ वाजता करमाळा तहसील कार्यालयासमोर हलगी नाद आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रा. झोळ यांच्यासह सहकारी नेते, शेतकऱ्यांच्या वतीने या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सदरचे निवेदन करमाळा तहसीलदार यांच्या वतीने जाधव रावसाहेब यांनी स्विकारले असून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी प्रा. झोळ यांच्यासह शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथआण्णा कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बापु तळेकर, मकाईचे माजी संचालक हरीभाऊ झिंजाडे, अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष (शप गट) संतोष वारे, पोपट फुके, किसन हानपुडे, बबन वीर, अशोक गोडगे, भगवान डोंबाळे, धनाजी जाधव, बापु फरतडे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.