तालुक्यातील आणि शेटफळ परिसरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी शिवसेनेच्या सहकार सेनेचे निवेदन; उप जिल्हाप्रमुख नवनाथ गुंड यांचा आंदोलनाचा इशारा…
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील तसेच शेटफळ (ना) येथील अवैध धंद्यांवर कारवाई करुन कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, यासाठी सहकार सेना-शिवसेना यांचेकडून करमाळा तहसीलदार तसेच करमाळा पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. याबाबत शेटफळ ग्रामपंचायत ठरावाची प्रत या निवेदना सोबत देण्यात आलेली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेटफळ येथे अवैध पेट्रोल, डिझेल, गुटका विक्री होत आहे. तसेच करमाळा तालुक्यातही दारू, अंमली पदार्थ विक्री, जुगार कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत. अवैध धंदे बंद करण्यात यावेत म्हणून शेटफळ ग्रामपंचायतीच्या वतीने ठरावही घेतला गेला आहे.
याबाबत लवकरात लवकर कारवाई करण्यात आली नाही तर दि. ०५/०७/२०२४ ला तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सहकार सेना- शिवसेना उप जिल्हाप्रमुख नवनाथ रामदास गुंड यांनी दिला आहे.
या निवेदनावर सहकार सेनेचे करमाळा शहरप्रमुख श्रीकांत गोसावी, उपतालुकाप्रमुख जोतीराम काळे, सहसचिव श्रीकृष्ण शिंदे, संदीप पाटील, नितीन यादव, प्रशांत गोसावी, अमोल कोलार, दादा निमगिरे यांच्यासह सहकार सेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.