प्रचार सभेपूर्वी पवारांसह मोहीते पाटील यांनी घेतली माजी आ. जगताप यांची भेट…



करमाळा, प्रतिनिधी – शुक्रवार दि. २६ रोजी करमाळा येथे माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ तसेच तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश आणि त्यानिमित्त शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री विजयसिह मोहिते पाटील आले असता त्यांनी भाजपचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेतली. मा.आ. जगताप हे भाजपचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या प्रचारात सक्रिय असल्याने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

करमाळ्यातील प्रचार सभेसाठी शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे करमाळ्यात आगमन होताच त्यांनी सर्वप्रथम बाजार समितीच्या प्रांगणातील देशभक्त नामदेवराव जगताप यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तद्नंतर त्यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेतली. यावेळी जगताप यांनी पवार यांचा यथोचित सत्कार केला. यापूर्वी विजयसिंह मोहिते पाटील यांनी जगताप यांच्या निवासस्थानी चहापानाच्या निमित्ताने भेट घेत चर्चा केली.

माजी आमदार जगताप भाजपचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या प्रचारात सक्रिय असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील घराण्याशी सलोख्याचे संबंध आहेत. याच पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे. शिवाय शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार नारायण पाटील यांच्याशीही जगताप यांची विशेष जवळीक आहे. या भेटीनंतर झालेल्या राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या सभेत मात्र मा.आ. जगताप समर्थकांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. या भेटीवेळी धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Advertisement


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page