अवघ्या पाच वर्षाच्या मंतशा चा पहिला रोजा पूर्ण…
करमाळा, प्रतिनिधी – इस्लाममध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात, हज हे पाच प्रमुख तत्वे आहेत. यानुसार रमजान महिन्यात साधारणपणे वयाच्या सातव्या वर्षापासून मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे करतात. मोठ्यांच्या आचरणाचा छोट्यांवर प्रभाव पडतोच, या उक्तीप्रमाणे शहरातील मोहल्ला भागातील अवघ्या पाच वर्षाच्या मंतशा जावेद शेख या चिमुकली ने सोमवार दि. २५ रोजी आपल्या आयुष्यातील पहीला रोजा स्वेच्छेने पूर्ण केला आहे.
शहरातील सहारा वेल्डिंग वर्क्सचे जावेद शेख हे पवित्र रमजानच्या काळात दरवर्षी पूर्ण महीना रोजे करतात. वडीलांनी ठेवलेल्या रोजांचे अनुकरण करून मंतशा हीने ही पहिला उपवास करण्याचा हट्ट धरून पवित्र रमजान महिन्यातील १४ वा रोजा सर्व नियमांचे काटेकोर पालन करून संध्याकाळी इफ्तारच्या वेळी नियमाप्रमाणे तो सोडला. भर उन्हाळ्यात मंतशाने हा १४ तासांचा कडक रोजा करुन रमजान महिन्यातील व आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
रोजा सोडण्यापूर्वी मंतशा ला नवीन कपडे, हार घालण्यात आले. सायंकाळी फलाहार घेऊन तिने उपवास/रोजा सोडला. अतिशय लहान वयात पवित्र रोजाचे सर्व नियमांचे अनुसरण करून श्रद्धेने रोजा पूर्ण केल्याबद्दल मंतशाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.