संभाव्य संधी लक्षात घेऊन नारायण आबा पाटील यांच्या बाबत कार्यकत्यांनी सक्रिय राहून जनमताचा अंदाज घ्यावा – जयप्रकाश बिले…


करमाळा, प्रतिनिधी – माढा लोकसभा मतदारसंघाबाबत सर्वच पक्षांतून उमेदवारीबाबत खल-विखल सुरू असून वरीष्ठ पातळीवरून माजी आमदार नारायण पाटील यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी वेळ द्यावा, अशी सूचना प्राचार्य जयप्रकाश बिले यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार नारायण (आबा) पाटील गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवार दि. २२ रोजी दुपारी दीड वाजता जेऊर ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. यावेळी प्रा. बिले बोलत होते.

होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी (शपगट) लढत स्पष्ट आहे. भाजपाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा पक्षाने संधी दिली असली तरी त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपातूनच विरोध होत असल्याचे दिसत आहे. यावरून गेले आठवडाभर नाराजी नाट्य मतदारसंघात दिसून येत असून या नाट्याचा शेवट कोणत्यातरी एका उमेदवारावर शिक्कामोर्तब करून होणार आहे. त्यामुळे २०१९ पूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला गेलेल्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादीकडूनही समोरच्या उमेदवारला तुल्यबळ उमेदवार देण्याची चाचपणी सुरू आहे. या दरम्यान माण-खटावचे अभयसिंह जगताप, निंबाळकरांच्या उमेदवारी वरून नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील, रासपचे महादेव जानकर, माढ्याचे ॲड. मगर यांच्यासह करमाळा माढा मतदारसंघाचे माजी आमदार नारायण पाटील यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार नारायण (आबा) पाटील गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची ही बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीला अठरा गावांतील पाटील गटाचे आजी-माजी पदाधिकारी आणि लोकनेते नारायण (आबा) पाटील मित्रमंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली.

यावेळी पुढे बोलताना प्रा. बिले म्हणाले की, माजी आमदार नारायण (आबा) पाटील हे लोकसभा निवडणुक लढवतील की नाही, हे वरीष्ठ पातळीवर चाललेल्या घडामोडींवर अवलंबून आहे. परंतु लोकसभा निवडणुकीबाबत जनतेची मते जाणून घेण्यासाठी जनसंवाद महत्वाचा आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी सक्रिय होऊन जनमताचा अंदाज घेत जनतेचा कौल जाणून घ्यावा. सामान्य लोकांमध्ये मिसळून त्यांची मते जाणून घ्यावीत. पुढील राजकीय परिस्थिती नुसार मा. आ. पाटील यांची संभाव्य उमेदवारी लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे.

बैठकीला आवाटी, नेरले, वरकुटे, अळसुंदे, सालसे, गौडरे, निमगाव, कोळगाव, हिवरे, हिसरे, फिसरे, जेऊर, कोंढेज, कुंभेज, पोफळज, भाळवणी, निंभोरे, पांगरे, शेलगाव (वां.) या गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब कोपनर यांनी प्रास्ताविक केले तर सोशल मीडिया तालूका प्रमुख संजय फरतडे यांनी आभार मानले.

Advertisement


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page