रश्मी बागल यांच्याकडे भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी…
मुंबई – मंगळवार दिनांक 27 रोजी करमाळा तालुक्यातील बागल गटाच्या भाजपा प्रवेशानंतर बागल गटाच्या प्रमुख रश्मी बागल यांची भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मंगळवारी सायंकाळी मुंबई येथे रश्मी बागल यांना या नियुक्तीचे पत्र दिले आहे.
निवडीनंतर बोलताना रश्मी बागल यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अपेक्षित असलेले भाजपाचे संघटनात्मक कार्य अधिक भक्कम व मजबूत करण्याकरिता प्रदेश महिला मोर्चाच्या माध्यमातून जास्तीत जास्त वेळ देऊन चांगल्याप्रकारे काम करु, याबद्दल मला विश्वास आहे. नव्याने दिलेली ही जबाबदारी यशस्वीतेने पार पाडणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
माजी सामाजिक न्याय मंत्री दिवंगत दिगंबररावजी बागल यांचे पुत्र दिग्विजय बागल तसेच कन्या रश्मीताई बागल यांनी मंगळवारी असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. बागल यांच्यासोबतच महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांनी देखील याचवेळी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार सावंत उपस्थित होते.
पक्ष प्रवेशाच्या या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे, विद्या विकास शिक्षण मंडळाचे सचिव विलास घुमरे, मकाईचे संचालक अमोल यादव, मार्केट कमिटीचे संचालक काशिनाथ काकडे, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश निळ, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हॉ. चेअरमन नानासाहेब लोकरे, मकाईचे संचालक आशिष गायकवाड, मकाईचे संचालक अनिल अनारसे, कलीम काजी, आनंदराव कांबळे, ॲड. नानासाहेब शिंदे तसेच विकास भोसले यांनी देखील उपस्थित राहून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.