दलित तरुण हत्याकांडा प्रकरणी शिवसेना शिंदे गट भिवंडी उपशहर प्रमुख कैलास धोत्रे याच्यावर तात्काळ कारवाई करा -यशपाल कांबळे…
करमाळा, प्रतिनिधी – भिवंडीतील युवकाला राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने अपहरण करून अत्याचार करुन फेकून दिल्या बाबत योग्य चौकशी करण्याची तसेच याप्रकरणी तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे यशपाल कांबळे यांनी केली आहे.
याबाबत करमाळा पोलीस निरीक्षक यांना शनिवार दि. 24 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. 14 फेब्रुवारी 2024 रोजी भिवंडीतील बी.एन.एम. कॉलेज जवळ देवा धोत्रे याने दलित तरुण संकेत भोसले याला धक्काबुक्की करत शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर देवा धोत्रेने त्याचा वडील कैलास धोत्रे (शिवसेना शिंदे गट, उपशहर प्रमुख) याला बोलवून घेतले. त्यानंतर कैलास धोत्रे व त्याच्या साथीदारानी संकेतचे अपहरण केले व त्याला अंमली पदार्थ पाजून पाईपने बेदम मारहाण केली. त्यात संकेत भोसले बेशुद्ध पडला. शुद्धीवर आल्यावर त्याने पाणी मागितले असता कैलास धोत्रे व त्याच्या साथीदारांनी आणि त्याच्या तोंडात लघवी केली व पुन्हा बेदम मारहाण सुरू केली त्यात संकेत बेशुद्ध पडला आरोपींनी संकेतला अज्ञातस्थळी फेकून देऊन पळ काढला. कुटुंबियांनी शोध घेतल्यानंतर संकेत त्यावेळी बेशुद्ध अवस्थेत होता संकेतला के ई एम रुग्णालय मुंबई येथे दाखल केले उपचारादरम्यान बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी दलित युवक संकेत भोसले याचा हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाला.
सदर निवेदनात पुढे म्हटले आहे की, संकेतचे अपहरण झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांनी ही घटना आमच्या परिसरात घडलेली नाही असे सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. तरी सदरील पोलिसाची चौकशी करून त्या पोलिसावरही गुन्हा दाखल करावा.
पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या घटना सतत घडत आहेत. असे आणखी किती बळी हे प्रशासन घेणार आहे? सत्तेचा माज असणाऱ्या कैलास धोत्रे व त्याच्या सहकाऱ्यांना ताबडतोब फास्टट्रॅक कोर्टात केस चालवून दलित युवक संकेत भोसले यांना न्याय मिळवून देण्यासाठी आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा करावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा ही देण्यात आला. यावेळी प्रसेंजित कांबळे, रणजीत कांबळे, विजय कांबळे आदिजण उपस्थित होते.