दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उजनीचा उपयुक्त साठ्याचे नियोजन आणि घटत्या पर्जन्यमानाच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजनांनी पर्यायी व्यवस्था शोधणे गरजेचे…
करमाळा, विशाल परदेशी – १२३ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणाचा मृतसाठा ६३ टीएमसी आहे तर उर्वरित ५४ टीएमसी पाणी हे उपयुक्त पाणी म्हणून साठविले जाते. धरणाची भिंत सोलापूर जिल्ह्यात असली तरी सर्वाधिक पाणीसाठा पुणे जिल्ह्यात होतो. घटत्या पर्जन्यमानाचा विचार करता शेतीसह विविध पाणीपुरवठा योजनांच्या नियोजनात बदल करणे आता निकडीचे बनले आहे. मागील काही वर्षांचा विचार करता पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला तर निर्धास्त राहण्याची मानसिकता सोडून एखाद्या पावसाळ्यात कमी पाऊस झाला असता पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. यावर्षीची अशीच परिस्थिती उद्भवल्याने आज जवळपास वजा २० पाणी पातळी लक्षात घेऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाणी सोडण्यावर ताबा ठेवणे गरजेचे आहे.
उजनी धरणावर पुणे, सोलापूर, नगर, लातूर, धाराशिव जिल्ह्याच्या शेती व पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. गेल्या वर्षी १०० टक्के पाणीसाठा असलेल्या धरणात आजच्या घडीला केवळ पंधरा टक्के उपयुक्त जलसाठा बाकी आहे. उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्तांची सध्या शेतीसाठीची पाण्याची गरज भागत असली तरी नदी, कालवा व पाणी योजनांद्वारे काही आवर्तने देणे अजून बाकी असल्याने धरण कोरडे पडणारच आहे. पाणलोट क्षेत्रातील लगतच्या विहीर बागायत असणाऱ्या क्षेत्रातील विहिरी कोरड्या पडण्यास सुरुवात झाली आहे. परंतु पाण्याचा अपव्यय करून पाणी सोडले गेले तर धरणग्रस्त शेतकरी त्यांचे ऊस, केळी व इतर फळबागा वाचवू शकतील. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील मतदारांचा विचार करून लोकप्रतिनिधी आपापल्या भागात पाणी सोडण्याचा आग्रह धरतील, पाणलोट क्षेत्रात वीज कपात करण्यात येईल, यामुळे पाणलोट क्षेत्रातील शेतकरी सध्या धास्तावलेला आहे.
तूर्ताची परिस्थिती लक्षात घेता आगामी आवर्तने नदी, कालव्यांद्वारे पाणी सोडताना नियोजनबद्ध रीतीने पाणी सोडणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात पाणी सोडल्यानंतर उजनी पाणलोट क्षेत्रात वीज कपात केली जाते. परंतु औज बंधाऱ्यात पाणी सोडताना कर्नाटक भागात मात्र वीज उपलब्ध असते. यामुळे खऱ्या धरणग्रस्तांची मात्र गळचेपी होते. सोलापूरला समांतर जलवाहिनीचे काम रखडलेले असल्याने पाण्याचा अपव्यय निश्चित आहे. इतर भागातील राजकीय दबावामुळे व धरणग्रस्त न क्षेत्रातील सक्षम आडकाठी नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. याच भीतीने उजनी पाणलोट क्षेत्रातील ऊस आणि केळी बागायतदारांवर अर्धे क्षेत्र मोडून पिके राखण्याची वेळ आली आहे. याचा दुरगामी परिणाम तालुक्याच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे.
अशा परिस्थितीत उजनीच्या पाणी नियोजनात भविष्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. याचाच एक भाग म्हणून पावसाळा व हिवाळ्यात होणाऱ्या आवर्तनांवर मर्यादा येणे गरजेचे आहे. उजनीने तळ गाठलेल्या अवस्थेत शेतकऱ्यांनी बागायती पिकांचा अट्टाहास सोडून कमी पाणी घेणारी भुसार पिके घेतली पाहिजेत. कालवा समिती, पाणी वाटप समितीत प्रत्येक तालुक्यातील शेतकरी प्रतिनिधी घेणे गरजेचे आहे. उजनी लाभक्षेत्रापासून दूर असलेल्या धायखिंडी करंजे भालेवाडीच्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे जवळपास 20 टक्के बचत केली आहे. याचा आदर्श घेऊन उजनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनीही ठिबक सिंचनाचा पर्याय चोखाळला पाहिजे. बारामती येथील तलावाप्रमाणे इतरही शहरी पाणीपुरवठा योजनांनी छोटे तलाव, बंधारे, विहिरी यांद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी स्त्रोत राखले पाहिजेत. सोलापूर शहरासाठी दीड टीएमसी पाण्याची गरज असताना नदीद्वारे पस्तीस टीएमसी पाणी सोडले जाते. हे टाळण्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वडापूर धरणाच्या बाबतीतही हालचाली वाढल्या पाहिजेत. करमाळा तालुक्यातील रेटेवाडी योजनाही कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी ही शासन स्तरावर प्रयत्न निगडीचे आहेत. जमिनीची धूप रोखण्यासाठी अवैध वृक्षतोडीवर नियंत्रण सुद्धा महत्वाचे आहे.
थोडक्यात पाण्याच्या अनियमिततेला अनुसरून अंदाजे ६ किमी रुंदी व १४० किमी लांबी असलेल्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण असलेल्या व या धरणाच्या पाण्यावर जवळपास ४० हून अधिक सहकारी व खाजगी साखर कारखाने, १५ औद्योगिक वसाहती, शेती व शेती पूरक व्यवसाय अवलंबून असल्याने धरणाच्या पाण्याचा वापर काटकसरीने होणे गरजेचे बनले आहे.