मुंबई-करमाळा स्लीपर बसमध्ये बेडींग वरून पडून वृद्धा जखमी…


करमाळा, विशाल परदेशी – करमाळा आगाराच्या मुंबईहून करमाळ्याकडे येणाऱ्या स्लीपर कोचच्या बेडींग वरून पडून 91 वर्षाच्या वृद्धेच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून तिच्यावर करमाळा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपासण्या केल्यानंतर प्रकृती विषयी अधिक माहिती देण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

या प्रकाराबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की करमाळा तालुक्यातील आवाटी येथील खान कुटुंबीय कुर्ला मुंबई येथून करमाळा आगाराच्या मुंबई-करमाळा (एम.एच. ०९- एफ एल ०१२१) या स्लीपर कोच मध्ये शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास करमाळा येथे येण्यासाठी बसले होते. रविवारी सकाळी पावनेआठच्या दरम्यान सदर वेगवान बस करमाळा तालुक्यातील कोर्टी गावाच्या वळणावर असताना बेडींगवर असलेल्या सुग्राबी अब्दुल खान (वय-९१) या बेडवरून बसमध्ये पडल्या व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. करमाळा येथे आल्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डोक्यावरील जखमेवर उपचार करून पुढील तपासण्या सुरू असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

या घटनेत सदर बसमध्ये प्रथमोपचार पेटी नसल्याचे सांगत बसच्या चालक-वाहक यांनी जखमीला दवाखान्यात नेण्यासाठी कोणतेही सहकार्य केले नसल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

सदर वृद्धा चालू बसमध्ये बेडींग वरून वाकून खाली बसलेल्या नातेवाईकांशी बोलत असताना तोल जाऊन खाली पडली. त्यानंतर तातडीने बस करमाळा बस स्थानकावर आणली. जखमी वृद्धेला दवाखान्यात नेण्यासाठी तत्परतेने रिक्षा बोलावून स्टॅंडसमोरील दवाखान्यात नेण्यास सांगितले व आगारात बस लावून आम्ही आलोच असे सांगितले. आगारात बस लावून स्टॅंडसमोरील दवाखान्यात जाऊन पाहीले असता सदर वृद्धेला नातेवाईकांनी दवाखान्यात आणले नसल्याचे कळाले.
-रेवन बावने,
चालक, करमाळा आगार.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page