मकाई कारखान्याची सर्व देणी दिल्यानंतर बागल गट विधानसभा लढवणार…
करमाळा, प्रतिनिधी – बागल गट संपला आता आम्हीच विरोधक आहोत, अशा भ्रमात काही नेते मंडळी असून
हा त्यांचा भ्रमनिरास होऊन बागल गट तालुक्याला सक्षम पर्याय देऊ शकतो, हे आम्ही कर्तुत्वाने सिद्ध करू, असा दावा बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी केला आहे. माजी मंत्री स्व. दिगंबर बागल यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहिल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना बागल म्हणाले की, मकाई सहकारी साखर कारखान्याची सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून वेळप्रसंगी स्वतःची संपत्ती गहाण ठेवून शेतकऱ्यांचे पैसे देऊ. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू असून आम्हाला लवकरच यश येईल असा विश्वास आहे. पण या गोष्टीचे भांडवल करून काही लोक बागल गट संपला, अशा प्रकारच्या वल्गना करत आहेत.
तथापि स्वर्गीय दिगंबरराव बागल यांच्या विचारांवर चालणारी मोठी मतदार संख्या करमाळा तालुक्यात असून आम्ही त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. स्व.दिगंबरराव बागल यांच्याबरोबर काम केलेले सर्व जुने जाणते नेते एकत्रित करून आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पुढील राजकीय दिशा लवकरच ठरणार आहे. तालुक्याच्या राजकारणात सध्या आमचा बॅड पॅच असला तरी येणाऱ्या काळात बागल गटाचा झेंडा विधानसभेवर फडकणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सुद्धा 50 टक्के ग्रामपंचायती बागल गटांनी जिंकलेल्या आहेत.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुमचा पक्ष कोणता असेल या प्रश्नावर उत्तर देण्याचे मात्र दिग्विजय बागल यांनी टाळले असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मात्र आभार व्यक्त केले आहे.