सालसे ते आवाटी दरम्यान नेरले हद्दीत आढळला अनोळखी मृतदेह…
करमाळा – तालुक्यातील सालसे-आवाटी रस्त्यावर गौंडरे पाटी नजीक आज (रविवार) सकाळी एक अनोळखी मृतदेह आढळला आहे. आसपासच्या ग्रामस्थांनी याबाबत पोलीस पाटील तसेच करमाळा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सालसे-आवाटी रस्त्यावरील साईवैभव मंगल कार्यालयाच्या पुढे अंदाजे ५०० मीटर अंतरावर चारीच्या बाजूला पुरुष जातीचा मृतदेह आढळला आहे. अंदाजे ३५ वय असलेल्या या मयताच्या डोक्याला कपाळावर जखम दिसत आहे. अंगात फुलबाहीचा निळा-लाल शर्ट असून फिकट निळ्या रंगाची जीन्स आहे. केवळ तंबाखूच्या पुडी शिवाय मृतदेहाजवळ कोणतेही वाहन, ओळखपत्र आढळून आले नाही. पो.हे.कॉ. संतोष देवकर आणि पो.ना. प्रदीप चौधरी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे.
घटनास्थळावरील पंचनाम्यानंतर पोलिसांनी कृष्णाई ॲम्ब्युलन्सच्या तुषार शिंदे आणि मनोज लालबेग यांच्या मदतीने मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. सदर मृतदेहाबाबत कोणाला काही माहिती असल्यास करमाळा पोलिसांत संपर्क साधण्याचे आवाहन करमाळा पोलिसांनी केले आहे.