आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे ऊस बिल न मिळाल्यास तीव्र आंदोलन करणार -प्रा. रामदास झोळ…
करमाळा, प्रतिनिधी – आदिनाथ सहकारी साखर कारखान्याने ऊस गाळप करून अद्यापही शेतकरी सभासदाला बिल न मिळाल्यामुळे शेतकरी सभासदांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून ऊस बिल तात्काळ देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रा. रामदास झोळ, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, गणेश वाळुंजकर यांनी दिला आहे.
याबाबत करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना दि. २६ /०१/२४ रोजी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की आदिनाथ सहकारी साखर कारखाना गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या गाळप उसाचे बिल अद्याप मिळालेले नाही. सध्या कारखाना बंद झाला असून साखर, मॉलिसीस, उपपदार्थ यांची विक्री प्रक्रिया सध्या चालू आहे. या विक्रीतून येणाऱ्या रकमेतून ऊस घातलेल्या शेतकऱ्यांची ऊस बिले प्राधान्याने देण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली होती.
याबाबत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक यांना तहसील कार्यालयाचे पत्र पाठवून सदर बिल देण्याविषयीच्या सूचना दिल्या आहेत. या पत्राची त्वरित दखल घेऊन आदिनाथ सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक व प्रशासक यांनी ऊस बिल न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रा. रामदास झोळ व त्यांचे सहकारी शेतकरी सभासद यांनी दिला आहे.