करमाळ्यात आज पुन्हा रंगणार ‘खेळ पैठणीचा’; वेळेचे बंधन पाळत पोलिसांनी अर्ध्यावर बंद केलेला कार्यक्रम पुन्हा होणार…
करमाळा, प्रतिनिधी – मकर संक्रांती निमित्त करमाळ्यात शनिवारी आयोजित क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत ‘होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम करमाळा पोलिसांनी वेळेच्या बंधनाच्या नियमावर बोट ठेवून रात्री दहा वाजता बंद केला. कार्यक्रम ऐन रंगात आला असताना पोलिसांच्या कार्यतत्परते मुळे हा कार्यक्रम बंद केल्यानंतर हजारोंच्या संख्येने उपस्थित महिलांच्या आनंदावर विरजण पडले असले तरी त्यांचा झालेला हिरमोड न पाहावल्याने या कार्यक्रमाचे आयोजक, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी आज रविवार दि. १४ रोजी सायं.५ ते १० पुन्हा हा कार्यक्रम होणार असल्याचे जाहीर केले आहे.
शनिवारी आयोजित या कार्यक्रमासाठी माढा लोकसभा मतदारसंघातून ठिकठिकाणच्या महीला या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोठ्या उत्साहाने करमाळ्यात दाखल झाल्या होत्या. कार्यक्रम महिलांसाठी असल्याने आयोजकांनी सुरक्षेची पूर्ण काळजी घेत कार्यक्रम स्थळी तब्बल चार एकर बंदीस्त जागेत अल्पोपहाराची आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाची नटखट सूत्रसंचालिका कु. सह्याद्री मळेगावकर हीने बहारदार सुरुवात केल्यानंतर उद्घाटनात काही वेळ गेला. यानंतर मात्र सह्याद्री आणि क्रांतीनाना मळेगावकर यांनी उखाणे आणि मजेदार खेळ घेत महीलांचा उत्साह द्विगुणित करत कार्यक्रमाला चांगलीच रंगत आणली. मात्र हा कार्यक्रम ऐन रंगात आला असताना करमाळा पोलिस स्टेशनचे मंगेश पवार यांनी ‘घड्याळा’वर बोट ठेवत हा कार्यक्रम नियोजित वेळेत म्हणजे दहा वाजता बंद करण्याची सूचना दिली. बऱ्याच विनवण्या केल्यानंतरही पोलिसांनी ध्वनिवर्धक यंत्रणा चालकांना कारवाईची तंबी देऊन शेवटी ‘दहा वाजून दहा मिनिटांनी’ हा कार्यक्रम बंद करण्यास भाग पाडले.
कार्यक्रम अर्ध्यावर बंद केल्यानंतर शेकडो नाराज महीलाभगिनींनी स्टेजवर जाऊन आयोजक अभयसिंह जगताप यांना कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. मात्र अभयसिंह जगताप यांच्यासह राष्ट्रवादी शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती करुनही पोलिसांनी ताठर भूमिका घेतल्याने त्यांचा नाईलाज झाला खरा पण कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी विनंती करण्याच्या निमित्ताने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभयसिंह जगताप आणि त्यांच्या अर्धांगिनी यांचा मतदारसंघातील महीला मतदारांशी बराचसा संपर्क सहजगत्या घडून आला.
कार्यक्रम बंद झाल्यानंतर हताश महिलावर्ग घरी गेल्यानंतर महीलांचा झालेला हिरमोड लक्षात घेऊन हा कार्यक्रम क्रांतीनाना मळेगावकर यांच्या उपस्थितीत आज रविवारी पुन्हा घेण्याचा निर्णय अभयसिंह जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री उशिरा जाहीर केला आहे.