मकर संक्रांती निमित्त शनीवारी महिलांसाठी खेळ पैठणीचा…
करमाळा, प्रतिनिधी – मुख्यत्वे महीलांचा सण समजल्या जाणाऱ्या मकर संक्रांती निमित्त शिवसंकल्प फाऊंडेशनचे अभयदादा जगताप यांनी करमाळ्यात ‘होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा’ या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महिलांसाठी पर्वणी असलेला हा खेळ शनिवार दि. १३ रोजी शहरातील कमलादेवी रोडवरील भारत पेट्रोलियमच्या पंपासमोरील प्रांगणात सायं. ६.३० वाजता घेण्यात येणार असल्याची माहिती अभयदादा जगताप यांनी दिली आहे.
महाराष्ट्रभर ख्याती असलेल्या क्रांतीसिंह मळेगावकर प्रस्तुत ‘होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा’ या मनोरंजनात्मक खेळ आणि उखाण्यांच्या कार्यक्रमाला महीलांची विशेष पसंती असते. त्यामुळेच मकर संक्रांतीचे औचित्य साधून अभयदादा जगताप यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात मनोरंजनासोबत आकर्षक बक्षिसांची लयलूट तर असणारच आहे, शिवाय कार्यक्रमास उपस्थित सर्व महीलांना पैठणी साडी भेट देण्यात येणार आहे.
तरी सर्व महीलाभगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अभयदादा जगताप आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.