सुभाष चौकाला श्रीराम चौक असं नाव देण्याविषयी मागणीबाबत काही..!!! – विवेक शं. येवले…
अयोध्येतील श्रीराम मंदिराबरोबरच दि.२२ जानेवारी रोजी करमाळ्यातील वेताळपेठेतील रामाचा हौद येथील पुरातन रामममंदिराचा जीर्णोद्धार व मूर्ती प्रतिष्ठापना समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या निमित्ताने शहरातील मुख्य सुभाष चौकाचे नाव बदलून श्रीराम चौक असे करण्यात यावे, अशी मागणी भाजप, सेना व अन्य कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेकडे केलेली आहे. म्हणून त्याविषयी काही माहितीपर…
या चौकाचे पूर्वी प्रचलित नाव खुनी चौक असे होते आणि ते नाव का, कशामुळे,कधी पडले याचे संदर्भ उपलब्ध नाहीत परंतु सुभाष चौक हे नामाधिकारण का,कधी कशामुळे झाले याचा संदर्भ असा आहे,आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा दि.१८ ऑगस्ट१९४५ ला विमान अपघातात दुर्दैवी असा अकाली मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वातंत्र्यप्रेमाने भारावलेल्या युवापिढीने या चौकाला सर्वानुमते सुभाष हे नाव दिले होते. हा इतिहास मी आमचे दादा, ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक कै. शंकरराव येवले,स्वातंत्र्य सैनिक कै. पवनलाल दोशी,साथी कै. मनोहरपंत चिवटे, कै.रतन नाईक, कै. गोकुळसिंग परदेशी, कै.डी.के.राजमाने आदी मंडळींच्या तोंडून ऐकलेला आहे.(या सगळ्यांची राजकारण विरहित मैत्री असल्याने या सगळ्यांची आमच्या दुकानात नेहमी बैठक असायची.)
त्याच प्रमाणे शहरातील सध्याच्या मेन रोडला नगरपालिकेने स्वातंत्र्यसैनिक कमलाकर सुमंत यांचे स्मृतिप्रीत्यर्थ सुमंत पथ, सध्या प्रचलित जय महाराष्ट्र चौकाचे पालिकेने स्वातंत्र्यपूर्व काळात दिलेले महात्मा गांधी चौक हे नाव दिलेले होते. (१९३२ साली या चौकात गांधीजींची सभा झाली होती म्हणून) त्याच प्रमाणे शहरातील काही वर्षांपूर्वीपर्यंत फुलसौंदर चौक असे नाव प्रचलित असलेल्या चौकाचे रावरंभाकालीन नाव सदर अथवा सदरा चौक असे होते. पहिले रावरंभा जानोजी यांच्या काळात किल्ला उभारणी तसेच कमलाभवानी मंदिराची उभारणी सुरू झाली. ज्यावेळी किल्ला वेशीबाहेर गावाचा विस्तार सुरू झाला त्यावेळी सर्वप्रथम जी पेठ व रस्ता झाला ती वेताळ पेठ. ही पेठ वसण्यापूर्वी तसेच किल्ला उभारण्यापूर्वी या परिसरात असलेल्या स्मशानभूमीमुळे (रावरंभा यांनी आपल्या जहागिरीची राजधानी करमाळा ही ठरवून किल्ला बांधण्यापूर्वी करमाळा हे गाव अस्तित्वात होते आणि किल्लावेशीतील मारुती मंदिर हे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले आहे याचे ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत) ही पेठ वसवताना येथे भुतांचा राजा (तत्कालीन समजानुसार इथली भुते धाकात राहावीत म्हणून) वेताळाचे मंदिर बांधण्यात आले म्हणून ही वेताळपेठ!
ही वस्ती पुढील काळात कमलाभवानी मंदिराच्या दिशेने वाढत गेली म्हणून मंगळवार पेठ, भवानी पेठ अशी नावे दिली गेली. कमलाभवानी मंदिर उभारणीच्या काळात अथवा त्यानंतर पाचपंचवीस वर्षांने एकमुखी दत्ताचे मंदिर बांधले गेले त्यामुळे या परिसरात झालेल्या वस्तीला दत्तपेठ, मधल्या भागात वसलेल्या जैन-गुजर, मारवाडी समाजाच्या वस्तीमुळे गुजर गल्ली, मारवाड गल्ली अशी नावे रूढ झाली. त्याच पद्धतीने कालौघात गाव वाढत असताना ज्या-त्या भागात वसत गेलेल्या भागांना जाती, समाज, आडनाव आदीनुसार नावे प्रचलित झाली. उदाहरणार्थ- फंड गल्ली, सावंत गल्ली, चांदगुड गल्ली, कानाड गल्ली, मोहल्ला, गवंडी गल्ली वगैरे !
त्याच पद्धतीने मूळ गावाच्या पश्चिमेला (किल्ला हे मूळ गाव नव्हे, त्याआधीचे गाव हे किल्ल्याच्या पूर्वेला असल्याने गावाच्या पश्चिमेला समशानभूमी, महारवाडा, मांगवाडा (तत्कालीन नावे,आताची दलित वस्ती) ही वस्ती वसवली गेली आणि सवर्ण लोकवस्ती असलेल्या मूळ गावाच्या पश्चिमेला जी पेठ वसली गेली ती करमाळ्याच्या पश्चिम दिशेला राशीन हे जगदंबा मातेचे तीर्थक्षेत्र असल्याने (राशीनचे मंदिर हे बाराव्या शतकात बांधले गेले आहे) तिला राशीन पेठ असे नाव रूढ झाले. याउप्पर या पेठेचा कसलाही ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध नाही.
त्यामुळे नामांतर करायचे असेल तर या पेठेचे नाव बदलून श्रीराम पेठ करावे, अशी तमाम करमाळावासियांची भावना दिसून येते आहे. आणि तसाही राशीनचा आणि करमाळ्याचा अर्थाअर्थी कसलाही संबंध नाहीये. राशीन हे ना कधी राजे रावरंभा यांच्या जहागिरीत होतं ना आताही आपल्या तालुक्यात वा जिल्ह्यात आहे. शिवाय प्रखर हिंदुत्व, हिंदुतेज, हिंदुराष्ट्र संकल्पना या सगळ्याची अनुभूती या पेठेइतकी शहरातील कुठल्याही गल्लीत, पेठेत दिसून येत नाही. त्यामुळे या पेठेचे नाव बदलून श्रीराम पेठ करावे, अशी तमाम करमाळा शहरवासियांची मागणी जोर धरत असल्याचे दिसून येते आहे !
– विवेक शं. येवले