बागल भावंडांच्या ‘आदीनाथ’वरील महादेवाला अभिषेकानंतर कर्मचारी ‘शेक’; काम बंद करण्याचा इशारा…
करमाळा, प्रतिनिधी – प्रशासक नेमणुकीपूर्वी बागलांची सत्ता असणारा आदिनाथ सहकारी साखर कारखाना सध्या प्रचंड अडचणीत असताना व मकाई सहकारी साखर कारखान्याची ऊस बिले थकीत असताना शनिवारी पहाटे चार वाजता दिग्विजय बागल व रश्मी बागल यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर जाऊन कारखाना स्थळावरील आदीनाथ मंदिरात जाऊन पूजा/अभिषेक केल्याची माहिती कर्तव्यावरील काही कर्मचाऱ्यांनी दिली आहे. शनिवारी पहाटे चार वाजता केलेल्या या पूजेदरम्यान कारखान्यातील काही कर्मचारी उपस्थित होते. या पूजेनंतर अवघ्या काही तासांतच आदिनाथ कारखान्यातील कर्मचारी आदिनाथ कारखाना बंद करण्याची भाषा बोलू लागल्याने या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध असल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
गत हंगामात मकाईला ऊस पुरवलेल्या शेतकऱ्यांची बिले मागील तेरा महिन्यांपासून थकीत आहेत. ही बिले मिळण्यासाठी विविध संघटनांनी अनेक वेळा विविध आंदोलने केली आहेत. मात्र मकाईच्या निवडणूकीनंतर सार्वजनिक भेटीगाठींपासून अलिप्त झालेले बागल बंधु-भगीनी अचानकपणे शनिवारी पहाटे आदीनाथ कारखान्याच्या कार्यस्थळावर अवतरले आणि पूजेनंतर काही कर्मचाऱ्यांशी चर्चाही केल्याची माहिती मिळाली आहे. तालुक्यातील कुरघोडीच्या राजकारणामुळे आदिनाथचे नेहमीच नुकसान होत आले आहे. चालू हंगामात आदिनाथ कारखान्याच्या जवळपास सहा हजार टन गाळप ऊसाचा ज्यूस कारखान्याच्या मशीनरीतच आहे. पगार केल्याशिवाय काम करणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्यामुळे हा ज्यूस वाया जाऊन मशिनरी नादुरुस्त होऊन सात ते आठ कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
चार वर्षांपूर्वीही आदिनाथच्या साखर विक्रीस कर्मचाऱ्यांनी विरोध केल्यामुळे विनाकारण 46 कोटी रुपये व्याज कारखान्याला भरावे लागल्यामुळे कारखाना दिवाळखोरीत निघून त्याचा भाडेतत्त्वावर लिलाव निघाला होता.
सुंदरदास पोळ यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येत कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून संपाचा इशारा दिल्यानंतर प्रशासक मंडळाकडून मात्र कुठलीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. त्यामुळे कारखान्याचे भवितव्य अंधारात आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी स्व. दिगंबरराव बागल यांचे योगदान महत्त्वाचे असून स्व. दिगंबरराव बागल यांच्या काळातच आदिनाथ कारखाना कर्जमुक्त झाला होता. त्यामुळे त्यांचे वारसदार रश्मी दिगंबरराव बागल व दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. बागल यांनी आदिनाथ कारखान्यावर येत असल्याचे सांगितले असते तर आम्ही त्यांच्या स्वागताला थांबलो असतो. पण अचानक पहाटे येऊन पूजा करून जाण्यामुळे विनाकारण सभासदांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
– महेश चिवटे,
प्रशासकीय संचालक,
आदीनाथ स.सा. कारखाना.