पोलीस पाटील भरती प्रक्रियेला जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती…
करमाळा, प्रतिनिधी – करमाळा-माढा तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रीया गुण जाहीर करून करण्याबाबत तालुक्यातील कोंढार चिंचोलीचे माजी सरपंच व आर टी आय कार्यकर्ते देविदास आप्पा साळुंके यांच्या यांनी अर्ज केला होता. या अर्जाची दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी ही भरती प्रक्रिया थांबवली असल्याची माहिती साळुंखे यांनी दिली आहे.
सोमवार दि. २६ रोजी गुण जाहीर न करताच पोलिस पाटील पदासाठी तोंडी परीक्षा घेण्यात येणार होत्या. गुण जाहीर करून मगच पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाव्यात अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते देविदास साळुंखे यांनी दि. 23 डिसेंबर रोजी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी पत्रे टाकून केली होती. याबाबत ‘तेजवार्ता’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. सोलापूर प्रहार अध्यक्ष दत्ता मस्के व त्यांची सर्व टीम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना समक्ष भेटून ही निवड प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे असा आग्रह धरला. यानंतर जिल्हाधिकारी यांनी पुढील आदेश येईपर्यंत या भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.
या अन्यायकारक भरती विरोधात देविदास आप्पा साळुंके यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने तसेच दै. संचारने ही बातमी प्रसिद्ध केल्यामुळे पोलीस पाटील पदांच्या शर्यतीतील उमेदवारांनी साळुंके आणि ‘तेजवार्ता’चे आभार मानले आहेत.