उद्यापासून श्री कमलाभवानी देवीच्या यात्रेला सुरुवात; गुरुवारी मुख्य यात्रा…
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्याचे आराध्यदैवत श्री कमलाभवानी देवीची यात्रा (कार्तिक उत्सव) उद्या रविवार दि. २६ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे तर मुख्य यात्रा गुरुवार दि. ३० रोजी होणार आहे. अठरापगड जातींना ठराविक मान असलेल्या या यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक गर्दी करतात. मुख्य यात्रेला रात्री १२ वाजता हत्ती या वाहनावरुन निघालेली उत्सवमूर्तीची मिरवणूक म्हणजे छबिना मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीतून मानकरी वाहन हातांवर घेऊन अलगद बाहेर काढतात. हा अद्भूत क्षण डोळ्यांत साठवण्यासाठी हजारो भाविक यावेळी उपस्थित असतात.
कार्तिक पौर्णिमेला भरणाऱ्या या यात्रेदरम्यान दुपारी ४ ते ६ आणि रात्री ९ ते १० वेगवेगळ्या वाहनावर देवीच्या उत्सवमूर्तीची मिरवणूक (छबिना) काढण्यात येते. यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवार दि. २६ रोजी दुपारी गरूड या वाहनावर तर रात्री सिंह या वाहनावर ही मिरवणूक संपन्न होईल. सोमवारी २७ नोव्हेंबरला दुपारी छोट्या नंदीवर तर रात्री मोठ्या नंदीवर छबिना मिरवणूक निघणार आहे. मंगळवारी २८ नोव्हेंबरला दुपारी काळवीट तर रात्री घोडा या वाहनावर मिरवणूक निघणार आहे. बुधवारी २९ नोव्हेंबरला दुपारी मोरावर तर रात्री लहान हत्तीवर छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी मुख्य यात्रा असून, या दिवशी रात्री ११ वा. ५५ मि. मंदिरातील सर्वच देवतांच्या उत्सवमूर्तींसह पाच वाहन आणि मोठा हत्ती या वाहनावरुन अशी श्री कमलाभवानी देवीच्या उत्सवमुर्तीची मिरवणूक निघणार आहे.
या मिरवणुकीत विविध बॅंडपथके, लोक कलाकार आपली कला सादर करतात. ही मिरवणूक मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आल्यानंतर श्री कमलाभवानी मंदिर ट्रस्ट तर्फे रेवडीची उधळण करत सर्व मानक-यांनाही रेवडी दिली जाते. भाविकांकडूनही या सर्व देवतांवर रेवडीसह खजुर खोब-याची उधळण केली जाते. रात्रभर चालणाऱ्या या मिरवणुकीत फटाक्यांची दैदिप्यमान आतिषबाजी पाहण्यासारखी असते. पहाटे तीन वाजता खंडोबाचा माळ येथे श्री खंडोबा आणि श्री कमलादेवी या भावाबहीणीची गळाभेट होते. यावेळी श्री खंडोबा देवस्थानाच्या वतीने श्री कमलाभवानी देवीला साडीचोळी ची भेट दिली जाते. यानंतर ही मिरवणूक परत पहाटे सहा वाजता मंदीरात परतते.
यात्रेनंतर सालाबादप्रमाणे शुक्रवार दि. १ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता खंडोबा माळ येथे कुस्त्यांचा आखाडा भरणार असून यामध्ये नामवंत मल्लांची हजेरी असणार आहे. तरी कलगीतुरे, शाहीर, कलावंत मंडळी तसेच करमाळा शहर व तालुक्यातील सर्व गणेश उत्सव मंडळ, झांज पथक, आराधी मंडळींनी यात्रे दिवशी हजेरी लावून यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन राजेरावरंभा तरुण मंडळ संलग्न श्री कमलादेवी यात्रा समितीने केले आहे.